या योजनेअंतर्गत कामगारांना वृद्धापकाळात दरमहा 3,000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल.
‘पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना’ कशी काम करते?
2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना सामाजिक सुरक्षा देणे आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील कामगार अर्ज करू शकतात. योजनेअंतर्गत कामगारांनी दरमहा काही ठराविक रक्कम योगदान करावे लागते, ज्यात सरकार देखील तितकीच रक्कम योगदान देते. उदाहरणार्थ, जर कामगाराने दरमहा 200 रुपये जमा केले, तर सरकारही त्याच रकमेचे योगदान देते. या योजनेत 20 वर्षे नियमित योगदान केल्यानंतर, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर कामगारांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी, कामगारांना त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी आधार कार्ड आणि बँक तपशील आवश्यक आहेत. एकदा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली की, कामगारांना त्यांच्या मोबाईलवर संदेशाद्वारे खाते उघडल्याची माहिती मिळेल. यानंतर, प्रीमियमची रक्कम दरमहा त्याच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाईल. पहिला हप्ता मात्र चेक किंवा रोख स्वरूपात भरावा लागतो.
योजनेचे फायदे
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना एक प्रकारची आर्थिक सुरक्षा आहे. ज्या कामगारांच्या पगारात नियमितता नसते, त्यांच्या निवृत्तीनंतरच्या काळातही आर्थिक आधार मिळवण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरते. या योजनेमुळे करोडो कामगारांना आर्थिक स्थैर्य मिळून त्यांच्या वृद्धापकाळातील चिंता कमी होतील.
पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना म्हणजे कामगारांसाठी एक सुरक्षितता कवच आहे. 60 वर्षांनंतर आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी दरमहा 3,000 रुपये पेन्शन देणारी ही योजना त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मदतगार ठरेल.