मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप पहिल्यापासूनच केला जातोय. आता त्याला पाठबळ देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांपैकी एक आरोपी सुदर्शन घुले याने निलंबित PSI राजेश पाटील यांची आदल्यादिवशी एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीचा व्हिडीओ समोर आला असून त्याच्या दुसऱ्या दिवशीच संतोष देशमुखांची हत्या झाली होती.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आठ दिवस होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी वेळेवर तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यांची भूमिका संशयास्पद होती. त्यामुळेच संतोषची हत्या झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केला आहे. त्याच अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे चार दिवसापूर्वीच निलंबन करण्यात आले.
पोलिसांना हत्येच्या नियोजनाबद्दल आधीच माहिती होतं का?
पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे केज शहरातील बसंत विहार या उडप्पी हॉटेलमध्ये भेटले होते. हा व्हिडीओ 8 डिसेंबर, संध्याकाळी 5.18 वाजताचा आहे. यावेळी आरोपी आणि पोलिस अधिकाऱ्यामध्ये काहीवेळ चर्चाही झाल्याचं दिसतंय. त्याच्याच दुसऱ्या दिवशी, 9 डिसेंबर रोजी दुपारी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.
आरोपी आणि पोलिस उपनिरीक्षकामध्ये नेमकी काय चर्चा झाली? पोलिस अधिकारी राजेश पाटीलला या हत्येप्रकरणी आधीच माहिती होतं का? या प्रश्नांची उत्तरं आता या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी करतील.
पोलिस निरीक्षक सक्तीच्या रजेवर, PSI निलंबित
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांचा अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. तर पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील याला निलंबित करण्यात आलं आहे. या दोघांनीही या प्रकरणात वेळकाढूपणा केल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात येतोय.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्यासह सात जणांचा सहभाग आढळला आहे. यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून चार आरोपी अद्याप फरार आहे.