Wednesday, December 18, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : आयजीएमला 84 लाखाचा निधी मंजूर

इचलकरंजी : आयजीएमला 84 लाखाचा निधी मंजूर

सर्वसामान्यांसाठी आधारवड बनलेल्या इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्यासाठी 60 लाख रुपये आणि रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी, अन्य पदाधिकारी व कर्मचार्‍यांना वाहनतळ उभारण्यासाठी 24 लाख असा 84 लाख रुपयांचा निधी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यात मंजूर करण्यात आलेला आहे.

इचलकरंजीतील शासकीय उपजिल्हा रुग्णालय असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात अत्यावश्यक सर्व त्या अत्याधुनिक सुविधा, सर्व प्रकारचे औषधापचार मिळावेत यासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यातून रुग्णालयाचे रुपडे पालटत आहे. इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुका आणि नजीकच्या सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी हे रुग्णालयात अत्यंत महत्वाचे व मध्यवर्ती आहे. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा याठिकाणी हळुहळू उपलब्ध केल्या जात आहेत. हे रुग्णालय राज्यातील नव्हे तर देशातील एक नंबरचे बनविण्याचा माजी आमदार प्रकाश आवाडे यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी इमारत दुरुस्तीसह आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यातूनच रुग्णालयाचे नुतनीकरण होत आहे.

त्याचदृष्टीने आमदार डॉ. राहुल आवाडे यांनीही इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण रुग्णालयात व रुग्णालय परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी 60 लाख 31 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

त्याचबरोबर या रुग्णालयात अधिकारी व कर्मचारी यांची संख्या मोठी असून त्यांना वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने आवारात लावण्यात येणार्‍या वाहनांमुळे प्रसंगी रुग्णसेवेत अडथळा निर्माण होते. त्यामुळे वाहनतळाची गरज ओळखून आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी वाहनतळ उभारणीबाबत मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नातून वाहनतळ बांधण्यासाठी 24 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रुग्णालयात उपलब्ध होणार्‍या सुविधा आणि उपचारांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

लवकरच हे रुग्णालय परिपूर्ण सुसज्ज असे बनेल आणि येथे दाखल होणार्‍या कोणत्याही रुग्णाला उपचाराविना परतावे लागणार नाही, असे आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी सांगितले. या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -