भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (२६ डिसेंबर) निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे. तसेच आज सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
पार्थिव दिल्लीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या (शनिवार २८ डिसेंबर) अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे बोललं जात आहे. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आज दिवसभर मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील ३ मोतीलाल मार्ग या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
मनमोहन सिंग यांना गुरुवारी रात्री ८ वाजता आपत्कालीन परिस्थिती दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. पण त्यांची प्रकृती चिंताजनक होती. यानंतर रात्री ९.५१ मिनिटांनी डॉ. मनमोहन सिंग यांची प्राणज्योत मालवली. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राहुल गांधींकडून शोक व्यक्त
“डॉ. मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातील जाण खूप उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहील. श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले. काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील, त्यांना कायम स्मरणात ठेवतील, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधींनी शोक व्यक्त केला.
अमेरिकेकडूनही शोक प्रस्ताव
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरातली अनेक नेत्यांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनीही त्यांचा नियोजित कार्यक्रम रद्द केला आहे. बारामतीतील अनेक गावांमध्ये आभार दौरा होणार होता. मात्र डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आज होणारा आभार दौरा रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल अमेरिकेकडूनही शोक प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. उत्कृष्ट चॅम्पिअन असा सिंग अशा शब्दात डॉ. मनमोहन सिंग यांचा उल्लेख करण्यात आला आहे. भारत आणि अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारीचे चॅम्पियन म्हणजे मनमोहन सिंग होते. दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी सिंग यांनी प्रयत्न केले होते.