पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवार गटाचा बडा नेता आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने याबद्दलची चर्चा सुरु आहे. या चर्चांना पूर्णविराम लागतो ना लागतो तोच आता शिंदे गटातील एका मोठ्या नेत्याने जयंत पाटील यांच्याबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतंच जळगावमध्ये जबरदस्त भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तसेच औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केले. यावेळी त्यांना जयंत पाटील यांच्या पक्षांतराबद्दलही विचारणा करण्यात आली. त्यावरही त्यांनी मत मांडले.
औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादावर गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले. बजरंग दलाचा हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. याबद्दल आमच सरकार विचार करेल. याबद्दल निर्णय घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आणि जो निर्णय होईल, त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही उभे राहू, असे गुलाबराव पाटील म्हणाले
गुलाबराव पाटील यांचे धक्कादायक विधान
“जयंत पाटील हे आमच्याकडे येतील”, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. यावरुन त्यांनी एका अर्थाने जयंत पाटील पक्षांतर करतील असे संकेत दिले आहेत. जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते. मी नाराज नाही.. मला बाहेर बोलण्याची चोरी आहे असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं होतं. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
…तर गुलाबराव पाटील कधी मागे बघणार नाही
“अबू आजमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब याच्याबद्दल बोलले. त्याला उत्तर देण्यासाठी विधानसभेत मी सर्वात आधी उठलो. जर आपण या देशात राहतो, या देशात खातो आणि जर तुम्ही औरंगजेबाची पुष्टी करत असाल तर हे सहन करणार नाही, हे सांगणारा पहिला गुलाबराव पाटील होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य कोणी करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. मंत्रीपद गेल खड्ड्यात. अशा पद्धतीने जर कोणी चुकीचे वागत असेल तर त्यांच्यासाठी गुलाबराव पाटील कधी मागे बघणार नाही”, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या इतिहासात फरक आहे. औरंगजेबाने सत्ता घेताना आपल्या बापाचा आणि भावाचा खून केला. मात्र औरंगजेबाने सगळे देऊ केल्यानंतरही छत्रपती संभाजी राजांनी धर्म सोडला नाही असा आमचा राजा होता आणि या राजाबरोबर तुम्ही औरंगजेबाची तुलना करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी परमेश्वराचे रूप आहे. त्यामुळे आम्ही सर्व काम करू. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान या देशांमध्ये सहन केला जाणार नाही”, असे गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितले.