म्हसळा तालुक्यात घुम गावातील सातवी मध्ये शिकणाऱ्या गर्वांग दिनेश गायकर या मुलाचा योग्य उपचारा अभावी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.06/04/2025 रोजी घडली आहे. गर्वांग यांच्या मृत्युने घूम गावासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून या मृत्युला माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचे आरोप त्याचा कुटुंबीयांनी केला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की गर्वांग यांच्या पायावर केस पूळी आल्याने त्याला शुक्रवारी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. यानंतर शनिवारी त्याला अचानक ताप भरल्याने रात्री १०:३० च्या सुमारास पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. गर्वांग याला ताप जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टरांनी सलाईन लाऊन त्याला स्टेबल केले व पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्वांगला त्याच वेळी रात्री १ वाजे पर्यंत माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेले.
त्यावेळी तेथील डॉक्टरांनी याला तर केस पुळी झाले, यावेळी ताप येतोच, एवढ्या छोट्या गोष्टी साठी १०८ ची रुग्णवाहिका कशाला आणायची, म्हसळयाचा डॉक्टरांना काही समजत नाही का ? असे बोलून विनाउपचार करता त्यांना घरी पाठवले. त्यानंतर घरी आल्यावर गर्वांगचा अचानक मृत्यू झाला. पोलिसांना दिलेल्या जबाबात गर्वांच्या वडिलांनी ही माहिती दिली आहे. डॉक्टरांनी गर्वांगला उपचारासाठी ठेवले असती तर तो सर्वांसोबत असता अशी भावना ग्रामस्थानी व्यक्त केली. गर्वांग उपचार न करणाऱ्या डॉक्टर वर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबांने केली आहे.