शासनाकडून बिलाची रक्कम प्रलंबित असल्याच्या कारणाने येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात भागीदारी तत्वावर सुरु असलेल्या सिटी स्कॅन तपासणी केंद्रातील सुविधा शुक्रवारी सकाळपासून थांबविण्यात आली. यामुळे रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे सन २०१६ पासून राज्य शासनाकडे हस्तांतरीत झाले. शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रूपये अनुदान मिळत असून त्यातून रूग्णालयामध्ये विविध सोयी सवलती दिल्या जातात.
त्यामुळे हातकणंगले, शिरोळ तालुक्यासह सीमावर्ती भागातील रूग्णांसाठी मोठा आधारवड बनले आहे. अत्याधुनिक सेवा-सुविधांनीयुक्त अशा या रुग्णालयात दीड वर्षापासून रुग्णांसाठी सिटी स्कॅन
सुविधाही देण्यात आली आहे. हे काम क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर या कंपनीला देण्यात आले आहे. अत्यंत माफक दरात रुग्णालयात दाखल रुग्ण आणि बाहेरुन संदर्भाने येणाऱ्या रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे.
या सुविधेचा लाभ रूग्णांना मोठ्या प्रमाणात होत होता. माफक दरामुळे दररोज किमान ३० ते ४० रुग्णांचे सिटी स्कॅन केले जात होते. तर महिन्याला ८ ते १० लाख रूपये बिल होत होते.
परंतु मागील तीन-चार महिन्यांपासून राज्य शासनाकडून क्रस्ना डायग्नोस्टिक यांची सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांची बिले प्रलंबित आहेत. प्रलंबित बिलासंदर्भात क्रस्ना डायग्नोस्टिक कडून शासनाला विनंती केली जात होती. मात्र याबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने सदरची सुविधा बंद करण्यात येत असल्याचे पत्र पाठवण्यात आले आहे.