अल्पवयीन मुलीला नवीन घड्याळ देण्याच्या बहाण्याने मासुरलीच्या जंगलात घेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत येथील नराधमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग (१) एस. आर. पाटील यांनी दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. भागोजी विठ्ठल बाऊदने (वय ३७, रा. अष्टविनायक गल्ली, कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे.
अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे लक्षतीर्थ वसाहतसह परिसरात त्यावेळी संतापाची लाट उसळली होती ४ नोव्हेंबर २०१९ मध्ये ही घटना घडली होती. राधानगरी पोलिसांनी नराधमाला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या घटनेचे कोठे वाच्यता केल्यास आई आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकीही नराधमाने अल्पवयीन पीडितेला दिली होती. त्यामुळे हे कुटुंब दबावाखाली होते. आरोपीने मुलीला पुन्हा दुसऱ्यांदा मासुरीच्या जंगलात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मुलीने यापूर्वी घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला .त्यानंतर संबंधित विरोधात गुन्हा दाखल झाला होता खटल्यात विशेष सरकारी वकील एडवोकेट अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले.