सर्वसामान्यांना महागाईच्या मोर्चावर मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशातील घाऊक महागाईत मोठी घसरण झाली. मंगळवारी सरकारी आकडेवारी समोर आली. त्यानुसार, भारतात घाऊक महागाई मार्च महिन्यात वार्षिक आधारावर महागाई 2.05 टक्क्यांनी घसरली. तर तज्ज्ञांनी महागाई 2.5 टक्के राहिल, असा अंदाज वर्तवला होता. सरकारी आकड्यांनुसार, अन्नपदार्थांचे उत्पादन, इतर उत्पादनं, खाद्य वस्तू, वीज आणि वस्त्र निर्मिती यांच्या किंमतीत झालेल्या एका मर्यादित वाढीमुळे घाऊक महागाई घसरल्याचे सांगण्यात येते. मार्च महिन्यात घाऊक अन्नधान्य महागाई (Wholesale Food Inflation) फेब्रुवारीतील 5.94 टक्क्यांहून घसरून 4.66 टक्के इतके झाले. मार्च महिन्यात प्राथमिक वस्तूंची महागाई फेब्रुवारीतील 2.81 टक्क्यांहून कमी होऊन 0.76 टक्के झाली.
उन्हाळ्यामुळे महागाईचा ताप
सूर्य देव सध्या देशात आग ओकत आहे. उष्णतेची लाट होरपळून काढत आहे. भारतीय हवामान खात्याने सुद्धा वाढलेल्या तापमानाविषयी अलर्ट दिला आहे. त्यामुळे महागाईच्या मोर्चावर चिंता वाढली आहे. बोफा ग्लोबल रिसर्चमधील, भारत आणि आसियान आर्थिक संशोधन प्रमुख राहुल बाजोरिया यांनी याविषयीचा अलर्ट दिला आहे. त्यानुसार, जसा उन्हाळा वाढेल, पालेभाज्या आणि फळांच्या किंमतीत वाढ होईल. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात भारतात किरकोळ महागाई ही सात महिन्याच्या निच्चांकावर 3.61% आली होती. महागाईचा दर जानेवारी महिन्यात 4.31 टक्के इतका होता. मंगळवारी सरकारने किरकोळ महागाईची आकडेवारी सुद्धा जाहीर केली.
महागाईवर RBI चा अंदाज काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीने (MPC) या महिन्याच्या सुरुवातीला अन्नधान्याच्या किंमती कमी झाल्याने महागाईचा आलेख उतरला. आर्थिक वर्ष 2026 मध्ये महागाईचा आलेख अजून खाली उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळेल. त्यांच्या खिशात पैसा खुळखुळेल. त्यांची मोठी बचत होईल.
आरबीआयच्या पतधोरण समितीने आर्थिक वर्ष 2025-26 साठी महागाईचा दर 4 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर फेब्रुवारीमधील बैठकीत 4.2 टक्क्यांचा अंदाज लावण्यात आला होता. आर्थिक वर्ष 2026 मधील चार त्रैमासिकमध्ये महागाईविषयी आरबीआयने एक अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, पहिल्या तिमाहीत महागाई दर 3.6 टक्के, दुसर्या तिमाहीत महागाई दर 3.9 टक्के, तिसऱ्या तिमाहीत हा दर 3.8 टक्के आणि चौथ्या तिमाहीत हा दर 4.4 टक्के असेल.