देशातील आघाडीच्या खासगी क्षेत्रातील दोन बँका एचडीएफसी बँक (HDFC ) आणि आयसीआयसीआय बँक (ICICI ) यांच्या शेअर्सनी गुरुवारी (17 एप्रिल) शेअर बाजारात नवा उच्चांक गाठला आहे . या दोन्ही बँकांचे आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल येत्या शनिवारी, 19 एप्रिल रोजी जाहीर होणार आहेत. निकालांपूर्वी गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता दिसून आली असून बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांना मोठी खुशखबर मिळाली आहे.
बँकिंग शेअर्समध्ये जोरदार तेजी –
आज बँकिंग शेअर्समध्ये आलेल्या जोरदार तेजीमुळे बँक निफ्टीने बेंचमार्क निफ्टी 50 पेक्षा चांगली कामगिरी केली. विशेषतः एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स यामध्ये सर्वाधिक वाढ झालेली दिसून आली आहे . बीएसईवरील आकड्यांनुसार, एचडीएफसी बँकेचा शेअर 1.07% वाढून 1,898.00 रु या आपल्या ऑल टाइम हाय स्तरावर पोहोचला. दुसरीकडे, आयसीआयसीआय बँकेचा शेअर 2.01% वाढून 1,384.05 रु या विक्रमी पातळीवर बंद झाला.
मार्जिन वाढण्याचीही शक्यता –
18 एप्रिल, शुक्रवार, रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांकडे फक्त आजच (17 एप्रिल) या बँकांचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्याची संधी आहे. विश्लेषकांच्या मते, बँकेचा नेट प्रॉफिट आणि नेट इंटरेस्ट इनकम (NII) यात वाढ होण्याची अपेक्षा आहे, पण मार्जिनवर काही प्रमाणात दबाव राहू शकतो. तसेच आयसीआयसीआय बँक वित्तीय कामगिरी मजबूत राहण्याचा अंदाज आहे. बँकेच्या नेट प्रॉफिटमध्ये 12.3% वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच NII 9.2% वाढू शकते. मार्जिन वाढण्याचीही शक्यता आहे.