महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालातील गोंधळ आणि प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे विद्यार्थी राज्यातील विद्यार्थी नेहमीच नाराज असल्याचे चित्र आहे
अशातच राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलावी आणि एकत्रित परीक्षेच्या पीएसआय, एसटीआय, एएसओ, एसआर या पदांमध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी (16 एप्रिल) पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने एमपीएससी विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आता यश मिळालं आहे. कारण एमपीएससीने मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. (MPSC exams postponed for a month after student protests)
एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याचे नोटिफिकेशन काढल्यापासून 45 दिवसानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात यावी, एमपीएससीद्वारे घेतल्या जाणाऱ्या राजपत्रित परीक्षेत पीएसआय, एसटीआय, एएसओ आणि एसआर या पदांची संख्या वाढवण्यात यावी. तसेच एसईबीसी-ईडब्लूएसच्या निकालातील चुकांविरोधात पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बुधवारी आंदोलन सुरू केलं होतं. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांकडून देण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता एमपीएससीने परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन स्थगित केलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटले की, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 च्या सुधारित निकालानुसार नव्याने पात्र ठरलेल्या 318 उमेदवारांना राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला नाही. त्यामुळे दिनांक 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उमेदवारांनी आयोगास दिलेली निवेदने प्राप्त झाली आहेत. उमेदवारांकडून प्राप्त निवेदने तसेच इतर सर्व बाबींचाविचार करून प्रस्तुत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 सुधारित वेळापत्रकानुसार दिनांक 27, 28 आणि 29 मे, 2025 या कालावधीत घेण्यात येईल. तसेच आरक्षणाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीचा विचार करून परीक्षेच्या वेळापत्रकातील प्रस्तुत बदल हा एकवेळची अपवादात्मक बाब म्हणून आयोगाकडून सदर निर्णय घेण्यात आला आहे, आयोगाने स्पष्ट केलं आहे.