पूर्ववैमनस्य आणि आर्थिक कारणावरून झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या पाठीतसंशयित चाकू भोसकून खून केला. बुधवारी रात्री रंकाळा परिसरातील पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मयत प्रशांत कुंभार याच्या मित्रांनी रंकाळा परिसरातील प्रणाली हॉलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. पार्टी चालू असताना नरेंद्र व प्रशांत यांच्यात पूर्वीच्या वादातून भांडण सुरू झाले. नरेंद्र प्रशांतला शिवीगाळ करू लागला. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करू लागले. यावेळी नरेंद्रने खिशातून चाकू काढून प्रशांतच्या पाठीत वार
केला. हा वार वर्मी बसल्याने प्रशांतच्या पाठीतून मोठया प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. हाताने जखम धरत तो हॉलच्या बाहेर गेला व तेथेच पडला. प्रशांत पडल्याचे पाहून हल्ला करणारा नरेंद्र तेथून पळून गेला. जखमी प्रशांतला मित्रांनी दुचाकीवर बसवून तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर प्रशांत मृत झाल्याचे सांगितले. रंकाळा परिसरात चाकू हल्ल्यात प्रशांत कुंभार याचा खून झाला असल्याची माहिती शिवाजी पेठ परिसरात पसरली. त्यामुळे युवकांनी रात्री सीपीआर रुग्णालयात गर्दी केली होती. पहाटे चार वाजता उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पूर्वीच्या आर्थिक वादातूनच हा खून झाला. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी पथकासह शोधमोहीम राबवून संशयित हल्लेखोर नरेंद्र साळोखे याला अटक केली.