तुम्ही जर एटीएम (ATM) वापरत असाल तर, हि माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. कारण 1 मे 2025 पासून तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएम शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली असून, 1 मे पासून मोफत व्यवहार मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त एटीएम व्यवहारासाठी 23 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क यापूर्वी 21 रुपये होते. त्यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे. तर हे शुल्क वाढवण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे, तसेच त्याचा फटका ग्राहकांवर कसा होईल, याची माहिती जाणून घेऊयात
शुल्क वाढवण्याचे कारण –
गेल्या काही वर्षांपासून बँका अन थर्ड पार्टी ATM ऑपरेटर यांच्याकडून शुल्क वाढवण्याची मागणी केली जात होती. एटीएम ऑपरेशनचा खर्च वाढल्याने या कंपन्यांना आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. यासाठीच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने यासंदर्भात शिफारस केल्यानंतर RBI ने शुल्कवाढीला मंजुरी दिली आहे. या कारणामुळे हे शुल्क वाढवण्यात आले आहे.
अतिरिक्त पैसे द्यावे लागणार –
सध्या ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या एटीएममधून महिन्यात 5 मोफत व्यवहारांची सुविधा आहे. मेट्रो शहरांमध्ये इतर बँकांच्या एटीएममधून 3 मोफत व्यवहार, तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार करता येतात. या मर्यादा जसाच्या तशाच राहणार आहेत. पण , या मर्यादेनंतर पैसे काढल्यास आता प्रत्येक व्यवहारासाठी 23 रुपये द्यावे लागणार आहेत. पण या वाढीचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होताना दिसणार आहे. तर हा नवीन बदल 1 मे 2025 पासून लागू होणार असल्याने, ग्राहकांनी आपले व्यवहार नियोजनपूर्वक करणे फायदेशीर ठरणार आहे .