महाराष्ट्रात मागील २४ तासांत मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. मराठवाड्यात ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहिल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
आज सकाळी मुंबई आणि उपनगरांत हलक्या पावसाने हजेरी लावली, तर ठाण्यात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना आजपासून पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईकरांनो छत्री घेऊनच घराबाहेर पडा –
हवामान विभागाने ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. शेतकरी आणि नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि छत्री बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत आज कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर वाऱ्यांचा वेग ३० किमी प्रतितास असेल. नवी मुंबईत आंशिक ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. पालघरमध्येही यलो अलर्ट लागू असून, कमाल तापमान ३३ अंश आणि किमान २६अंश सेल्सिअस राहील.
वीकेंडला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासह ठाण्यात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुढील तीन दिवस हलक्या पावसाची नोंद होईल. राज्यातील किमान तापमानात बदल अपेक्षित नाही. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, विशेषत: घाटमाथा आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.