Friday, July 4, 2025
Homeब्रेकिंगकोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी सर्वांचेच एकमत; मुख्यमंत्र्यांसोबत आठ दिवसांत बैठक

कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी सर्वांचेच एकमत; मुख्यमंत्र्यांसोबत आठ दिवसांत बैठक

कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींचे एकमत आहे. याबाबत आठ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊ, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी सांगितले.

 

सर्वांना विश्वासात घेऊनच ही हद्दवाढ होणार असल्याचे खासदार शाहू महाराज यांनी सांगितले.

 

हद्दवाढीसंदर्भात न्यू पॅलेस येथे बैठक झाली. या बैठकीला दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते. या बैठकीनंतर पालकमंत्री आबिटकर आणि मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना बैठकीतील माहिती दिली.

 

शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीवरून दोन मतप्रवाह आहेत. हद्दवाढ व्हावी, यासाठी हद्दवाढ समर्थक कृती समितीने आंदोलनाचा रेटा लावला आहे; तर हद्दवाढीसाठी ग्रामीण भागातील एक इंचही जागा देणार नाही, अशी भूमिका प्रस्तावित गावांतील लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. समर्थक कृती समितीने काही दिवसांपूर्वी खा. शाहू महाराज यांची भेट घेऊन हद्दवाढीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार शाहू महाराज यांनी सोमवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, माजी आमदार ऋतुराज पाटील, करवीरचे राहुल पाटील यांना बैठकीसाठी निमंत्रित केले होते. मात्र, या बैठकीला आ. नरके, आ. महाडिक व आ. माने उपस्थित राहिले नाहीत. माजी आमदार ऋतुराज पाटील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झालेे. आमदार सतेज पाटील हेदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. मात्र, भूमिका मांडत असताना त्यांचा संपर्क तुटला.

 

खा. शाहू महाराज म्हणाले, हद्दवाढीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेची आहे. हद्दवाढीचा निर्णय राज्य शासन घेणार आहे. त्यामुळे सर्वांची भूमिका ऐकण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. यामध्ये हद्दवाढीचे विरोधक आणि समर्थक असा कोणताही भेदभाव नाही. सर्वांनी विकासासाठी एकत्र यायचे आहे. सर्वांशी संपर्क झाला आहे. आणखी सविस्तर चर्चा घेऊन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली जाईल.

 

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, सर्वांना विश्वासात घेऊनच हद्दवाढीवर निर्णय होणार आहे. त्यासाठी आठ दिवसांत मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली जाईल. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, हद्दवाढ करायचीच आहे. याबाबत बैठकीत सर्वांचेच एकमत झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -