Monday, November 24, 2025
Homeब्रेकिंगआई-बाबा आता नाही सहन होत! पैशासाठी विवाहितेचा छळ, २२ वर्षीय मुलीनं जीवन...

आई-बाबा आता नाही सहन होत! पैशासाठी विवाहितेचा छळ, २२ वर्षीय मुलीनं जीवन संपवलं

चारचाकी वाहन घेण्यासाठी व इतर खर्चासाठी माहेरुन पैसे आण म्हणून पती मराहाण करायचा. तुला नीट स्वयंपाक करता येत नाही, तु नवऱ्याची किंमत ठेवत नाही, असे म्हणत सासू-सासरे मानसिक आणि शारीरीक छळ करायचे.

 

आता नाही सहन होत म्हणून बाबांना फोन करून सांगत होती. मात्र परिस्थीतीने हतबल आईवडील व्यवस्थीत संसार करा, एवढंच सांगत होते. अखेर त्रासाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने ओढणीने गळफास घेऊन जीवन संपवले.

 

दोन मुली एकाच घरात, ५ वर्षांपूर्वी झाला विवाह

 

मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी येथे ३ जून रोजी दुपारी १२:४५ वा. च्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. आशाराणी पवन भोसले, असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी आशाराणीचे वडील नागराज बरुण्णा डोणे (रा. रायचूर, ता. जि. रायचूर, कर्नाटक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती पवन भोसले, सासू अलका बलभीम भोसले, सासरे बलभीम चंद्रभान भोसले, यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचोली काटी एमआयडीसी परिसरातील पवन भोसले याच्यासोबत आशाराणीचे लग्न ५ नोव्हेंबर २०१९ रोजी झाले होते. हिंदू रितीरिवाजाप्रमाणे पवन भोसले याचा मानपान करून लग्न केले. आशाराणीची मोठी बहीण त्याच घरात नांदत होती. दोघीही मुली सख्या दोन भावांना दिल्यामुळे त्यांचा संसार चांगला सुरु होता. आशाराणी हिला तीन वर्षांची मुलगी आहे.

 

२ वर्षांनी सुरू झाला छळ

 

लग्नानंतर २ वर्षे पवन याने आशाराणी हीस व्यवस्थित नांदविले. त्यानंतर तो तिला चारचाकी वाहन घेण्यासाठी व खर्चासाठी तुझ्या आई वडिलांकडून पैसे घेवून ये, असे म्हणून वारंवार मारहाण शिवीगाळी करत होता. त्याबाबत आशाराणी ही माहेरी गेल्यानंतर सांगत होती. तिच्या आई-वडिलांनी सासरच्यांना आमची परिस्थीती नाही, तुम्ही पवनला समजावून सांगा असे सांगितले. मात्र त्यांनीही आम्हाला ‘आमच्या मुलाचा मानपान केला नाही, लग्नात हुंडा दिला नाही, त्यामुळे तो पैसे मागत आहे, तुम्ही पैसे द्या,’ असे म्हणाले. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनीसुद्धा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही तिचा छळ सुरूच होता.

 

आता सहन होत नाही…

 

दोन्ही मुली एकाच घरात दिल्या असल्यामुळे फिर्यादी मुलीचे वडील नागराज बरुण्णा डोणे यांनी एकीमुळे दुसरीचा पण संसार मोडेल म्हणून पैशाची तजवीज करुन जावई पवन भोसले याला ऑनलाईन पैसे पाठविले. त्यानंतरही तिला त्रास सुरूच होता. तुमच्या मुलीला स्वयपाक येत नाही, ती आमच्या मुलाची किंमत करत नाही, अशा तक्रारी आईवडिलांना सांगितल्या जात होत्या. होणारा त्रास आशाराणी आपल्या वडिलांना फोन करून सांगत होती. आता सहन होत नाही, म्हणत होती. मात्र हतबल आई-वडील दोन्ही मुलींना व्यवस्थीत संसार करा, असेच सांगत होते.

 

अखेर उचललं टोकाचं पाऊल

 

ऑक्टोबर २०२४ मध्ये आशाराणीला पती पवन भोसले याने मारहाण करुन घरातून हाकलून दिले. त्यानंतर मुलीसह माहेरी रायपूर येथे आली होती. माहेरच्यांनी याबाबत विचारले असता तिच्या पतीने मारहाण केली, पैसे घेऊन ये नाहीतर घरी येऊ नको, असे सासू-सासरे यांनी सांगितले. दरम्यान, पतीने सोलापूर येथील महिला तक्रार निवारण कक्षात पत्नी नांदायला येत नाही, अशी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी समुपदेशन करून आशाराणीला नांदायला पाठवले. मात्र त्यानंतरही तिला पती, सासू-सासरे वारंवार त्रास देत होते. त्या त्रासाला कंटाळून ३ जून रोजी दुपारी घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेवून जीवन संपवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -