आयपीएल 2025मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चॅम्पियन ठरल्यानंतर बंगळुरूत विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सर्वात पहिली अटक करण्यात आली आहे. निखिल सोसाले याला अटक करण्यात आली आहे. निखिल हा आरसीबीच्या मार्केटिंग टीमचा हेड आहे. त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे. निखिल सोसाले याला अटक झाल्यानंतर तो कोण आहे? याची चर्चा रंगली आहे.
आरोप काय?
निखिल सोसालेवर या परेडबाबतचा मोठा आरोप ठेवण्यात आला आहे. व्हिक्ट्री परेड इव्हेंटची त्याने प्लानिंग नीट केली नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यासोबतच दुसरी इव्हेंट कंपनी DNA च्या तीन कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. निष्काळजीपणामुळेच हे बळी गेल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
निखिल सोसाले याला विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. तो मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत होता. तो एअरपोर्टवर पोहचताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याने या इव्हेंटचं प्लानिंग किती केलं होतं? खरोखरच प्लानिंग होतं की नव्हतं? याची माहिती पोलीस घेत आहेत.
कोण आहे निखिल?
निखिल सोसाले हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025च्या बहुतेक सामन्यात प्रेक्षक गॅलरीत विराट कोहलीची बायको अनुष्का शर्मासोबत सावलीसारखा दिसला होता. आयपीएलच्या या सीजनमध्ये अनुष्कावर जेव्हा जेव्हा कॅमेऱ्याचा फोकस गेला तेव्हा तेव्हा निखिल हा अनुष्कासोबत दिसला.
आयपीएलच्या फायनलमध्ये बंगळुरू टीम चॅम्पियन बनल्यावर निखिल सोसाले हा मैदानावर अनुष्कासोबत दिसला. निखिलच्या इन्स्टाग्रामवर विराट कोहली, अनुष्का शर्मासह साक्षी धोनी, युजवेंद्र चहल, दीपिका पल्लीकल, ट्रेव्हिस हेड, जहीर खान, हेजल कीच ( युवराज सिंगची बायको), फाफ डुप्लेसिस, सुरेश रैना आदी मोठे स्टार फॉलो करतात.