बनावट कागदपत्रांच्या आधारे चारचाकी वाहनाची विक्री करून येथील बालाजी विजय धायगुडे (वय 24, रा. छत्रपत्री शिवाजीनगर) या चांदी उद्योजकाची 5 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी 5 जणांना हुपरी पोलिसांनी अटक केली.
सैफुल्लमा नासीर दुधगावे (वय 27, रा. हुपरी), विनायक भगवान पाटील (29, रा. रेंदाळ), अकबर साहेबकी पठाण (24, रा. रेंदाळ), गणेश संभाजी कोळी (31) व रोहित विरुपाक्ष पाटील (27, दोघे रा. घोसरवाड, ता. शिरोळ) अशी संशयितांची नावे आहेत.सैफुल्लमा दुधगावे, विनायक पाटील व विजय धायगुडे हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. याच ओळखीतून त्यांनी विजयचा विश्वास संपादन करीत चारचाकी गाडीची बनावट कागदपत्रे तयार करून 6 जूनला 15 लाख रुपयांना ही गाडी त्यांना विकली होती. त्यापैकी 5 लाख रुपयांचा अॅडव्हान्सही घेतला होता. त्यानंतर संशयितांनी धायगुडे याच्या अंगणातील गाडी रात्रीच्या वेळी बनावट चावीने पळवून नेली. धायगुडे यानी संशयितांकडे गाडी किंवा रक्कम परत देण्याचा तगादा लावला; मात्र त्यांनी पूर्तता केली नसल्याने विजय यांनी हुपरी पोलिसांत फिर्याद दिली.
भामटे सराईत गुन्हेगार
अटक केलेले भामटे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांना हुपरीतील काळम्मावाडी वसाहतीत चार दिवसांपूर्वी झालेल्या सव्वा सात लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी विजय धायगुडे यांची फसवणूक केल्याची कबुली त्यांनी दिली.