Tuesday, July 22, 2025
Homeमहाराष्ट्रपत्नीवर चारित्र्याच्या संशय, रात्री झालेल्या वादातून डोक्यात घातला बांबू; घटनास्थळी पोलिसांनी पाहिलं...

पत्नीवर चारित्र्याच्या संशय, रात्री झालेल्या वादातून डोक्यात घातला बांबू; घटनास्थळी पोलिसांनी पाहिलं भयानक…

सांगली येथील विजयनगरजवळील राजर्षी शाहूनगरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात पतीने बांबूने वार करत निर्घृण खून केला. शिलवंती पिंटू पाटील (वय ३०) असे मृत पत्नीचे नाव आहे.खुनानंतर पती पिंटू तुकाराम पाटील (३६, मूळ रा. हुलजंती, ता. मंगळवेढा, सोलापूर) हा दोन लहान मुलांना घेऊन पसार झाला होता. एलसीबीच्या पथकाने त्याला आंत्रोळी (जि. सोलापूर) येथून अटक केली. चारित्र्याच्या संशयातून हा खून केल्याची कबुली पाटील याने पोलिसांना दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी आहे. काही वर्षांपासून तो सांगलीत राहतो. गवंड्याच्या हाताखाली आणि मजुरीची कामे तो करतो. मूळच्या नंदूर (जि. सोलापूर) येथील परंतु सांगलीत हनुमाननगरमध्ये स्थायिक असलेल्या शिलवंती यांच्याशी पिंटू याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांना दोन मुले आहेत.

 

सध्या विजयनगरजवळील राजर्षी शाहूनगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम चालू होते. तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शिलवंती दोन मुलांसह राहत होते. शिलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारायचे काम करत होती; तर पिंटू हा मजुरीवर कामास जात होता.

 

काही दिवसांपासून पिंटू आणि शिलवंती यांच्यात किरकोळ कारणांवरून सतत वाद होता. या वादास कंटाळून शिलवंती १३ जून रोजी घर सोडून निघून गेली होती. पिंटूने संजयनगर पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. शिलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती. शनिवारी (ता. २१) ती पतीकडे परत आली होती. त्यानंतरही दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरू होती. शिलवंती परत आल्याचे संजयनगर पोलिसांना सांगितले नव्हते. आज (ता. २६) पहाटेच्या सुमारास पिंटूने बांबूने शिलवंतीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला. त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला.

 

पिंटूने पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला. त्या व्यक्तीने संजयनगर पोलिसांना कळवले. त्यानंतर संजयनगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेले ठिकाण शोधले. शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शिलवंती पाटील ही मृतावस्थेत पडल्याचे आढळले. परिसरातील नागरिकांना माहिती समजताच त्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपाधीक्षक विमला एम., संजयनगरचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाच्या सूचना दिल्या. स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, नाना कांबळे यांच्यासह पथकाने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेला. सायंकाळी उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली.

 

पिंटू पाटील याला शोधण्यासाठी संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांची दोन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली होती. उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक मागावर होते. पथकातील अंमलदार गुंडोपंत दोरकर यांना पिंटू हा आंत्रोळी (ता. मंगळवेढा) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीचे संदीप पाटील, श्रीधर बागडी, अभिजित माळकर, सुमित सूर्यवंशी, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, अभिजित पाटील यांच्या पथकाने तातडीने आंत्रोळीकडे धाव घेत त्याला ताब्यात घेत सांगलीत आणले. त्याला संजयनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

 

सांगोल्यातूल फोन आला अन्…

 

पिंटू पाटील याने पहाटे शिलवंतीचा खून केला. तिचा मृत्यू झाल्यानंतर तो दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडला. जाताना पत्र्याच्या शेडला कडी लावली. काही वेळानंतर त्याने सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला त्याने पत्नीचा खून केल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीने या घटनेची माहिती संजयनगर पोलिसांना दिली. पण, प्रत्यक्षात तो राहात असलेल्या परिसराबाबत काहीच माहिती पोलिसांकडे नव्हती. त्या व्यक्तीकडून पोलिसांनी पिंटूचे फोटो मिळविले. विजयनगर परिसरातील काही लोकांना त्याचा फोटो दाखविल्यानंतर तो शाहूनगरमध्ये राहात असल्याची माहिती समोर आली. संजयनगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेले ठिकाण शोधून काढले. त्यानंतर खुनाचा प्रकार समोर आला.

 

चारित्र्याच्या संशयावरून वाद

 

पिंटू व शिलवंती या दोघांत सतत भांडणे होत होती. या भांडणाला कंटाळून शिलवंती घर सोडून काही दिवस बहिणीकडे गेली होती. ती शनिवारी सांगलीत परतली. हनुमाननगर येथील माहेरी ती दोन दिवस राहिली. त्यानंतर काल ती शाहूनगर येथील घरी आली होती. यावेळी चारित्र्याच्या संशयावरून रात्री दोघांत वाद झाला. या वादानंतर ती झोपली असता लाकडी बांबूने डोक्यात वार करून खून केल्याची कबुली पिंटू पाटील याने पोलिसांत दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -