इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाला निराशाजनक कामगिरीमुळे हातातला सामना जिंकता आला नाही. भारताकडून या सामन्यात 4 फलंदाजांनी 5 शतकं केली. त्यानंतरही यजमान इंग्लंडने टीम इंडियावर 5 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे कॅप्टन शुबमन गिल आणि हेड कोच गौतम गंभीरवर काही प्रमाणात दबाव आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतो.
पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकूण 8 कॅचेस सोडल्या. तसेच जसप्रीत बुमराह याचा अपवाद वगळता इतर गोलंदाजांना काही खास करता आलं नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. पहिल्या सामन्यातून साई सुदर्शन याने पदार्पण केलं. तर दुसऱ्या सामन्यातून आता वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला संधी मिळू शकते.
प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराजकडून निराशा
प्रसिध कृष्णा याने पहिल्या कसोटीत एकूण 5 विकेट्स घेतल्या. मात्र त्याने 6 पेक्षा अधिकच्या इकॉनॉमीने धावा दिल्या. त्यामुळे इतर गोलंदाजांवर दबाव वाढला. त्यामुळे प्रसिधला दुसऱ्या टेस्टमधून डच्चू दिला जाऊ शकतो. इतकंच काय तर मोहम्मद सिराज याला 2 विकेट्सच मिळवता आल्या. त्यामुळे सिराजच्या जागी अर्शदीप सिंह याचा समावेश केला जाऊ शकतो.
जसप्रीत बुमराहला विश्रांती
टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यातील 5 पैकी 3 सामन्यातच खेळणार असल्याचं आधीपासूनच स्पष्ट आहे. त्यानुसार, बुमराहला दुसऱ्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे अर्शदीपला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.
बर्मिंगहॅममधील खेळपट्टी अनुकूल
बर्मिंगहॅममधील खेळपट्टी स्विंग गोलंदाजांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे अर्शदीपला या खेळपट्टीतून अधिक मदत मिळू शकते. अर्शदीप वनडे आणि टी 20i क्रिकेटमध्ये दोन्ही बाजूने बॉल स्विंग करतो. त्यामुळे कॅप्टन गिल अर्शदीपवर विश्वास दाखवू शकतो.
डावखुरा गोलंदाज म्हणून प्राधान्य!
टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 वेगवान गोलंदाजांना संधी दिली होती. मात्र यात एकही डावखुरा बॉलर नव्हता. त्यामुळे बॉलिंगमध्ये विविधतेसाठी अर्शदीपचा विचार केला जाऊ शकतो.
काउंटी क्रिकेटचा अनुभव
अर्शदीपकडे इंग्लंडमध्ये रेड बॉलने खेळण्याचा अनुभव आहे. अर्शदीप काउंटी क्रिकेटमध्ये खेळला आहे. त्यामुळे अर्शदीपचा इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव टीम इंडियासाठी फायदेशीर ठरु शकतो.