पोळगाव (ता. आजरा) येथील एकाने पुलावरून चित्री नदीच्या प्रवाहात उडी मारली. गुणाजी गोविंद खामकर (वय ४९, रा. पोळगाव) असे त्यांचे नाव आहे. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास पत्नी व भाच्यासमोर हा प्रकार घडला.
नदीचा प्रवाह वेगवान असल्याने ते वाहून गेले. आजरा पोलिसांकडून तातडीने शोध मोहीम राबविण्यात आली आहे.
घटनास्थळ व ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी, गुणाजी हे सिक्युरिटीमध्ये मुंबई येथे नोकरी करीत आहेत. गेले चार महिने ते आजारी होते. आठ दिवसांपूर्वी ते उपचारासाठी गावी आले होते. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात काही दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. गुरुवारी (ता. २६) त्यांना गावी आणण्यात आले. आज त्यांच्या पोटात दुखत असल्याचे त्यांनी पत्नी अर्चना व भाचा संदीप धनवडे यांना सांगितले. ते दोघे गुणाजी यांना मोटारसायकलवर बसवून आजऱ्याकडे दवाखान्यात नेत होते.
पोळगाव पुलावर मोटारसायकल आल्यावर त्यांनी पाय दुखत असल्याचे कारण सांगून दुचाकी थांबवण्यास सांगितले. ते पुलावरून चालत गेले. थोडे दूर गेल्यावर त्यांनी दोघांच्या समोर चित्री नदीत उडी मारली. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ते प्रवाहाबरोबर वाहत गेले. याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच पुलावर गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार समीर माने, सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांकडून शोध मोहीम
चित्री नदी आजऱ्याकडे वाहत येते. चित्री प्रकल्पातून पाणी सोडले आहे. त्यामुळे चित्रीचा प्रवाह वेगवान झाला आहे. वेगवान प्रवाहामुळे ते वाहत गेले. त्यांचा शोध परोली बंधाऱ्यावरही घेण्यात येत होता. चित्रीच्या प्रवाहात झाडे-झुडपे वाहत असल्याने ते अडकले असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.