पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगारातर्फे विशेष एसटी बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा इचलकरंजी आगारातून एकूण ३५ एसटी भाविकांच्या सोयीसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिली.
भाविकांना महामंडळाच्या सर्व सवलती देण्यात येणार असून चाळीस किंवा त्याहून अधिक भाविकांनी एकत्र येऊन त्यांच्या गावातून एसटीची मागणी केल्यास संबंधित गावातून थेट बससेवा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही भाविकांचा मोठा प्रतिसाद अपेक्षित असून, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी आगाराशी संपर्क साधून आपली बस आरक्षित करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. यामुळे वारीकाळात भाविकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.