कॅन्सर किंवा HIV सारख्या जीवघेण्या रोगाचे निदान असणाऱ्या रुग्णांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. एका सरकारी पॅनेलने सुमारे २०० आवश्यक औषधांवर कस्टम ड्युटीमध्ये सूट देण्याची शिफारस केली आहे. तर काही कर्करोगाच्या औषधांवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द करण्याचे म्हटले आहे.जर ही शिफारस लागू केली गेली तर या औषधांच्या किमती कमी होऊ शकतात आणि उपचार स्वस्त होऊ शकतात. त्यामुळे दवाखान्यामुळे आर्थिक संकटात आलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
औषधांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी आणि भारतात आरोग्यसेवा स्वस्त करण्यासाठी हे पाऊल उचलले जाऊ शकते. विशेषतः कर्करोग, क्षयरोग, मधुमेह आणि हृदयरोग यासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. पॅनेलने सल्ला दिला आहे की जर त्यांच्यावर लावण्यात येणारा कर कमी केला तर कंपन्यांना हि सर्व औषधें स्वस्त मिळतील आणि रुग्णांना त्याचा थेट फायदा मिळेल. तसेच, भारतात औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांचा खर्च देखील कमी होईल. भारत अजूनही अनेक आवश्यक औषधे आणि त्यांच्या कच्च्या मालासाठी चीनसारख्या देशांवर अवलंबून आहे. जेव्हा या गोष्टी परदेशातून आयात केल्या जातात तेव्हा त्यावर आयात शुल्क आकारले जाते, ज्यामुळे औषध महाग होते. परंतु नवीन शिफारसी नुसार औषधांचे दर कमी केले तर सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होईल, आरोग्यसेवा बळकट होईल आणि लोकांना स्वस्त औषधे मिळू शकतील.
कोणकोणत्या औषधांच्या किमती कमी होऊ शकतात ?
या रिपोर्टनुसार, दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या किमती कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे जी अनेकदा सर्वसामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर असतात. ज्या औषधांच्या किमती कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये जवळपास २०० औषधें आहेत. यातील ७४ औषधे अशी आहेत ज्यावर ५% कस्टम ड्युटी आकारण्यात आली आहे, तर ६९ औषधे आहेत ज्यावर पूर्णपणे सूट देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ५६ औषधांना कस्टम ड्युटीतून सूट देण्याचेही सांगण्यात आले आहे. पॅनेलने स्पाइनल मस्क्युलर अॅट्रोफी, सिस्टिक फायब्रोसिस, गौचर रोग, फॅब्री रोग, लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर आणि आनुवंशिक एंजाइम कमतरता यासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील कस्टम ड्युटी काढून टाकण्याची शिफारस केली आहे. यापैकी एका डोसची किंमत लाखोंमध्ये असते. यामुळेच बहुतेक लोक ती खरेदी करू शकत नाहीत. या यादीत झोलजेन्स्मा, स्पिनराझा, एव्हरीस्डी, सेरेझाइम आणि तख्झायरो सारख्या औषधांचाही समावेश आहे. ही सर्व औषधे खूप महाग आहेत त्यामुळे भारतीय रुग्णांना ती खरेदी करणे शक्य होत नाही.