पूर्ववैमनस्यातून दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला करून दुचाकी पेटवून दिल्याची घटना गुरुवारी दुपारी मंगळवार पेठ येथे घडली. हल्ल्यात सुदेश बाळकृष्ण मौसमकर (वय 45) आणि पत्नी रेखा सुदेश मौसमकर (42, रा.जुने एनसीसी ऑफिसजवळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर) हे जखमी झाले. याप्रकरणी हल्लेखोर दयानंद कुरडे (रा. मंगळवार पेठ) याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुरुवारी दुपारी मौसमकर दाम्पत्य दुचाकीवरून घराकडे जात होते. ज्योतिर्लिंग कॉलनीत पोहोचल्यानंतर संशयित कुरडे याने दाम्पत्याला हाक मारली. सुदेश यांनी वेग कमी करून दुचाकी थांंबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयिताने पळत येऊन कोयत्याने हल्ला केला. डोक्यात ईजा झाल्याने दाम्पत्य दुचाकीवरून कोसळले. त्यानंतर संशयिताने महिलेवरही हल्ला केला.
दाम्पत्याने घटनास्थळी दुचाकी सोडली. नागरिकांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. दाम्पत्य रुग्णालयात गेल्यानंतर संशयिताने त्यांची दुचाकी पेटवून दिली. या प्रकारामुळे परिसरात काहीकाळ खळबळ उडाली. संशयिताला रात्री उशिरापर्यंत अटक झाली नव्हती.