महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेला यंदा एक वर्ष पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने गेल्यावर्षी १८ जून २०२४ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना आधार देण्यासाठी मासिक आर्थिक मदत देईल, असे सांगण्यात आले.
त्यानुसार दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये ही रक्कम जमा होते. मात्र आता एकापाठोपाठ एक राज्यातील लाडक्या बहिणींना धक्के बसत आहेत. राज्य सरकारने आता ८० हजाराहून अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा फटका बसला आहे.
सध्या राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी सरकारकडून निकष लावण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या आयकर विभागाकडून छाननी केली जात आहे. त्यातच आता महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील जालना आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे. आयकर विभागाच्या छाननीनंतर विविध कारणांमुळे हजारो अर्ज अपात्र ठरले आहेत. ज्यामुळे अनेक महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
जालना जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद
जालना जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी एकूण ५ लाख ४२ हजार ३९२ अर्ज दाखल झाले होते. मात्र, आयकर विभागाकडून सुरू असलेल्या पडताळणीमध्ये जवळपास ५७ हजार अर्ज बाद करण्यात आले आहेत. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणे, कुटुंबात सरकारी नोकरदार सदस्य असणे, चारचाकी वाहन असणे, विहित वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असणे आणि संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांचा लाभ घेत असतानाही ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करणे, यांसारख्या विविध कारणांमुळे हे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
या छाननीनंतर आता जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची संख्या ४ लाख ८४ हजार ६९४ इतकी झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून या योजनेसाठी नवीन नोंदणी बंद झाली आहे. नुकत्याच अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होणार नाही, असे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे. तर जालना जिल्ह्यातील ६५ महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ सोडला आहे.
नागपूर जिल्ह्यात ३० हजार अर्ज अपात्र
नागपूर जिल्ह्यातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला फटका बसला आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १० लाख ७३ हजार महिलांनी अर्ज केले होते, त्यापैकी साधारण ३० हजार लाडक्या बहिणींचे अर्ज प्राथमिक पडताळणीत बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यात कार असलेल्या महिला, आयकर भरणारे कुटुंबिय असलेल्या महिला आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांच्या अर्जांचा समावेश आहे. हे सर्व अर्ज प्रामुख्याने अपात्र ठरले आहेत.
सध्याही लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात अपात्र होणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ‘किंग मेकर’ ठरलेल्या या योजनेतील मोठ्या प्रमाणात अर्ज बाद केले जात असल्याने सध्या लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.