इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा सामना हा 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. शुबमन गिल भारताचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स इंग्लंडची धुरा सांभाळणार आहे. भारताला तिसऱ्या सामन्यात 22 धावांनी पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. त्यामुळे चौथा सामना भारतासाठी अटीतटीचा आहे. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघाच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. भारताच्या एका खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे हा खेळाडू चौथ्या सामन्यातील निवडीसाठी उपलब्ध नसणार.
चौथ्या सामन्यातून युवा खेळाडू आऊट!
मँचेस्टर टेस्टआधी भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्शदीप दुखापतीमुळे चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार. त्यामुळे भारतासाठी हा मोठा झटका समजला जात आहे.
भारताने खेळलेल्या याआधीच्या तिन्ही सामन्यात अर्शदीपला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. अर्शदीपचं अद्याप कसोटी पदार्पण झालेलं नाही. मात्र अर्शदीपचं चौथ्या सामन्यातून पदार्पण होण्याची शक्यता होती. मात्र दुखापतीमुळे ती शक्यताही उरली नाहीय.
अर्शदीपला अशी झाली दुखापत
अर्शदीपला मँचेस्टरमध्ये सराव सत्रादरम्यान दुखापत झाली. अर्शदीप नेट्समध्ये बॉलिंगचा सराव करत होता. अर्शदीपने या दरम्यान साई सुदर्शन याने मारलेला फटका अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात अर्शदीपच्या हाताला बॉलचा फटका लागला. त्यानंतर वैद्यकीय पथकाने अर्शदीपच्या हाताची पाहणी केली. अर्शदीपच्या हातावर टाके पडले.
इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआय सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अर्शदीपच्या हाताला टाके मारण्यात आले आहेत. अर्शदीप चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. अर्शदीप पाचव्या सामन्यासाठी उपलब्ध असणार की नाही हे पाहिलं जाईल.
दरम्यान वेगवान गोलंदाज आकाश दीप चौथ्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत अजून निश्चित नाही. आकाश मँचेस्टरला रवाना होण्याआधी सराव सत्रातही सहभागी झाला नाही. तसेच उपकर्णधार ऋषभ पंत याच्या दुखापतीनेही भारताचं टेन्शन वाढवलं आहे. त्यामुळे आता चौथ्या सामन्यात कोण खेळणार आणि कोण बाहेर जाणार? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.