लातूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे छावा संघटनेचे पदाधिकारी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रोंवादीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली आहे. अजित पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकल्यानंतर हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिंमडळात रमी खेळतानाचा कथित व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर आता राज्यभरातून सरकारवर टीका केली जात आहे. याच व्हिडीओनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे बसलेले असताना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आक्रमक होत त्यांच्यासमोर पत्ते टाकले होते. तसेच हे घ्या पत्ते आणि मंत्र्यांना तुमच्या घरी पत्ते खेळायला सांगा, असे म्हणत कोकाटेंचा निषेध केला होता. याच घटनेनंतर आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली.
बेदम मारहाण, शिवीगाळही केली
या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडीओत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बेदम मारहाण करताना दिसत आहेत. तसेच मारहाण करताना शिवीगाळही केली जात आहे. या मारहाणीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हेदेखील आहेत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने काय सांगितलं?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे लातूरमध्ये आले होते. यावेळी आम्ही त्यांना कृषीमंत्र्यांविरोधात निवेदन दिले. हे निवेदन देताना मी हे पत्ते घ्या आणि कृषीमंत्र्यांना ते पत्ते द्या. त्यांना पदावरून बडतर्फ केला, असे आम्ही त्यांना सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गुंडानी येऊन आमच्यावर हल्ला केला. आम्हाला अमानुष मारहाण केली. हा हल्ला शेतकऱ्यांच्या पोरांवर आहे. राष्ट्रवादीची हीच वागणूक आहे का? असा माझा सवाल असल्याचं छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील यांनी केला.
याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार
अजित वार हे शेतकऱ्यांसाठी मोठ्या गप्पा करता. तुम्ही असे चुकीचे कृषीमंत्री राज्याला देताय आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मारहाण करताय. याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार, असा इशाराही छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिला आहे