वेगवेगळे आमिष दाखवून लोकांना फसवणुकीचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून जागृकता केली जात असताना गुंतवणूकदार फसवणुकीस बळी पडत असतात. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत शेअरमधील गुंतवणुकीतून पाच कोटींची फसवणूक झाली होती. आता कल्याणमध्ये आणखी एक मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आली आहे. एका नोकरदाराला तब्बल ८०० टक्के नफ्याचे आमिष दाखवत ७१ लाख ३८ हजार रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
तिघांवर फसवणुकीचा गुन्हा
कल्याण शहरात पुन्हा एकदा ऑनलाईन शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. कल्याण-मुरबाड रोडवरील सिंडिकेट परिसरात राहणारे नोकरदार सुनील रामचंद्र यादव यांच्याकडून तब्बल ७१ लाख ३८ हजार ४९० रुपये इतक्या रक्कमेची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रामचंद्र यादव यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर रिया, अनुष्का डे आणि यशस्वी शर्मा या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियातून संपर्क
एप्रिल २०२५ ते जून २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत या तिघांनी व्हॉट्सॲप आणि विविध मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून यादव यांच्याशी संपर्क साधला. ८०० टक्के नफ्याचे आमिष दाखवून त्यांनी शेअर गुंतवणूक विषयक ॲप लिंक डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्या लिंकवरून गुंतवणूक करताना टप्प्याटप्प्याने यादव यांच्याकडून विविध बँक खात्यांवर पैसे वळते करून घेतले गेले. त्यानंतर बनावट नफा दाखवून विश्वास संपादन केला. जेव्हा यादव यांनी मूळ रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वेगवेगळी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. शेवटी मूळ रक्कम आणि नफा काही मिळाला नाही हे लक्षात आल्यानंतर यादव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस निरीक्षक सोपान नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या फसवणूक प्रकरणाचा तपास सुरू आहे. वाढत्या ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी त्या व्यक्तीची विश्वसार्हता तपासली पाहिजे, असे पोलिसांकडून नागरिकांना सांगण्यात आले आहे.