डोंबिवलीकर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना शेअर गुंतवणुकीत वाढीव नफ्याचे अमिष दाखवून पाच कोटीचा गंडा घातल्याची घटना ताजी असताना, कल्याणमध्ये एका नोकरदाराला शेअर गुंतववणुकीत ८०० टक्के नफ्याचे आमिष दाखवून तिघा जणांनी मिळून ऑनलाईन गुंतवणूकीच्या माध्यमातून तब्बल ७१ लाख ३८ हजार ४९० रूपयांचा गंडा घातला.
पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून हे उघडकीस आले आहे. सुनील रामचंद्र यादव असे फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव असून ते कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या सिंडिकेट परिसरात राहणारे आहेत. एप्रिल २०२५ ते जून २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
या संदर्भात सुनील यादव यांनी दिलेला तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी रिया, अनुष्का डे आणि यशस्वी शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुनील यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीन महिन्यांच्या कालावधीत सदर तिघांनी मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला. व्हॉट्स ॲपद्वारे वेगवेगळ्या ६ क्रमांकांच्या माध्यमातून आपणास शेअर गुंतवणुकविषयक मार्गदर्शन केले.
शेअर गुंतवणुकीत गुंतवणूक केल्यास किमान कालावधीत ८०० टक्के नफा मिळवून देऊ, असे या तिघांनी अमिष दाखविले. त्यासाठी तक्रारदार यादव यांना शेअर गुंतवणूक विषयक लिंक मोबाईलमध्ये डाऊन लोड करण्यास सांगितली. या लिंकच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने तिन्ही इसमांनी तक्रारदार यादव यांच्याकडून ठराविक रकमा स्वतःच्या बँक खात्यावर वळत्या करून घेतल्या.
अशाप्रकारे एकूण ७१ लाख ३८ हजाराची रक्कम तिघांनी दिलेल्या विविध बँक खात्यावर जमा करून घेतली. दरम्यानच्या काळात केलेल्या गुंतवणुकीवर वाढीव नफा जमा झाल्याचा आभास निर्माण करणाऱ्या तिघांनी गुंतवणूकदार यादव यांना ऑनलाईन माध्यमातून बनावट पध्दतीने नफा दाखविण्यास सुरूवात केली. काही रक्कम तक्रारदार यादव यांनी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना विविध कारणे देऊन रक्कम काढून देण्यात अडथळे आणण्यात आले.
सततचा तगादा लावूनही वाढीव नफ्याची रक्कम देण्यात गुंतवणूक सल्लाकारांकडून टाळाटाळ केली जात होती. नफ्याची रक्कम मिळत नसल्याने तक्रारदार यादव यांनी मूळ रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. ती रक्कम देण्याऐवजी विविध कारणे सांगून अजून रक्कम गुंतवणूक करण्यास सांगून नकार दिला. शेअर गुंतवणुकीत गलेलठ्ठ नफ्याचे अमिष दाखवून तिघांनी आपल्याकडून ७१ लाख ३८ हजार ४९० रूपये उकळले. शिवाय या रकमेवरील वाढीव नफा आणि मूळ रक्कमही परत न करता आपली आर्थिक फसवणूक केल्याची खात्री पटल्यावर गुंतवणूकदार सुनील यादव यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात पोलिस अधिकारी सोपान नांगरे आणि त्यांचे सहकारी चौकस तपास करत आहेत.