शेतात अत्यवस्थ पडलेल्या मोराला वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तीन युवकांचे प्रयत्न निष्फळ ठरले असून मोराचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या बाबतची माहिती अशी की, दि. २० जुलै रोजी केज तालुक्यातील डोणगाव येथे सायंकाळी ६ च्या सुमारास उत्तरेश्वर घुले यांना त्यांच्या शेतात अत्यवस्थ असलेला मोर आढळून आला.
त्यांचे मित्र हनुमंत घुले आणि अशोक केदार यांच्या मदतीने ते मोराला वाचविण्यासाठी केज येथे घेऊन आले. त्यांनी केज पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलिस नाईक शिवाजी कागदे यांनी पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. मस्के आणि धारूर वनविभागाचे वनसेवक वाचिष्ठ भालेराव, शाम गायसमुद्रे व जीवनसिंग गोके यांच्याशी संपर्क साधला. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच मोराचा मृत्यू झाल्याची माहिती पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मस्के आणि वनसेवक वचिष्ठ भालेराव यांनी दिली.
मोराचा मृत्यू हा विषबाधेने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असून वनविभागाचे विभागीय वनअधिकारी गुणावत, वनरक्षक पाईक यांच्या आदेशाने वनसेवक वचिष्ट भालेराव, चालक शाम गायसमुद्रे, जीवनसिंग गोके या कर्मचाऱ्यांनी मृत्यू झालेल्या मोराचा शरीर ताब्यात घेत ते उत्तरीय तपासणीसाठी घेऊन गेले असून त्याची उत्तरीय तपासणी व शविच्छेदन केल्या नंतर नियमा नुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.