Saturday, July 26, 2025
Homeक्रीडायशस्वी, साई आणि पंतची अर्धशतकं खेळी, भारताच्या पहिल्या डावात 358 धावा

यशस्वी, साई आणि पंतची अर्धशतकं खेळी, भारताच्या पहिल्या डावात 358 धावा

ओपनर यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन आणि उपकर्णधार ऋषभ पंत या त्रिकुटाने केलेलं अर्धशतक आणि शार्दूल ठाकुर याच्या चिवट खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी सर्वबाद 358 धावा केल्या आहेत. भारताच्या शेवटच्या 3 फलंदाजांचा अपवाद वगळता इतर सर्वांना आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र एकालाही या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊन मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्स याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर इतरांनी त्याला चांगली साथ दिली.

 

भारताचा पहिला डाव

केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने 94 धावांची आश्वासक आणि संयमी भागीदारी करुन भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र थोडक्यासाठी शतकी भागीदारी हुकली. भारताने 94 रन्सवर पहिली विकेट गमावली. केएलने 98 बॉलमध्ये 46 धावा केल्या. त्यानंतर भारताने ठराविक अतंराने 2 विकेट्स गमावल्या. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल आऊट झाले. यशस्वीने 58 धावा केल्या. तर कर्णधार शुबमन 13 धावांवर बाद झाला.त्यामुळे भारताची 3 बाद 140 अशी स्थिती झाली.

 

त्यानंतर साई आणि उपकर्णधार ऋषभ पंत या जोडीने भारताचा डाव सावरला. मात्र 68 व्या ओव्हरमध्ये पंतला दुखापतीमुळे मैदान सोडून बाहेर जावं लागलं. पंत 48 चेंडूंमध्ये 37 धावा करुन रिटायर्ड हर्ट झाला. पंतनंतर साईची साथ देण्यासाठी रवींद्र जडेजा मैदानात आला. भारताने पहिल्या दिवशी साई सुदर्शनच्या रुपात चौथी आणि शेवटची विकेट गमावली.

 

भारताच्या 235 धावा असताना साई आऊट झाला. साईने 151 बॉलमध्ये 7 फोरसह 61 रन्स केल्या. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकुर या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 83 षटकांत 4 बाद 264 धावा केल्या.

 

दुसऱ्या दिवसाचा खेळ

जडेजा आणि ठाकुर जोडीने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी 6 विकेट्सच्या मोबदल्यात 92 धावाच जोडता आल्या. रवींद्र जडेजा 20 धावा करुन बाद झाला. शार्दूल ठाकुर याने 88 चेंडूत 41 धावांची चिवट खेळी केली. शार्दुलनंतर भारताचा जखमी वाघ ऋषभ पंत मैदानात आला. चाहत्यांनी पंतचं टाळ्या आणि शिट्ट्यांनी स्वागत केलं. पंतने एकेरी-दुहेरी धाव घेत धावफळक हलता ठेवला. इंग्लंडने या दरम्यान झटके देणं सुरुच ठेवलं. वॉशिंग्टन सुंदर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. वॉशिंग्टनने 27 धावा केल्या. डेब्यूटंट अंशुल कंबोज याला भोपळाही फोडता आला नाही.

 

त्यानंतर जोफ्रा आर्चर याने पंतला क्लिन बोल्ड केलं. पंतने 75 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्ससह 54 धावा केल्या. यासह पंतच्या झुंजार खेळीचा शेवट झाला. पंतनंतर जसप्रीत बुमराह आऊट झाला आणि भारताचा डाव आटोपला. बुमराहने 4 धावा केल्या. तर मोहम्मद सिराज 5 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्स याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चर याने तिघांना बाद केलं. तर ख्रिस वोक्स आणि लियाम डॉसन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -