शहरातील तांबापुरा भागात वास्तव्यास असलेल्या तरुणाला काँक्रिट मिक्सरने चिरडल्याची घटना घडली. नेरी येथे मासे घेण्यासाठी जात असताना उमाळा गावाजवळ झालेल्या अपघातात साहिल खाटीक (वय २३) याचा मृत्यू झाला.
जळगाव-अजिंठा महामार्गावर उमाळा (ता. जळगाव) घाटाजवळ सुसाट क्राँक्रीट मिक्सर (एमएच १५, जीव्ही ५६३०) वरील चालकाने जळगावकडून येणाऱ्या दुचाकीला (एमएच १९, इक्यू. ३१३८) धडक दिली. अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा होऊन साहिल खाटीक याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन अपघाताला कारणीभूत काँक्रिट मिक्सर पेालिसांनी ताब्यात घेतला आहे.
रुग्णालयात गर्दी
साहिलचा अपघात झाल्याची माहिती तांबापुरा येथील त्याच्या घरी कळताच कुटुंबीयांसह नातेवाईक व परिसरातील तरुणांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याचे वडील मोहम्मद खाटीक यांचे स्वतःवरील नियंत्रण सुटून त्यांनी एकच आक्रोश केला. थोड्याच वेळात जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर जमाव एकवटला होता.
चार बहिणींचा एकुलता भाऊ
साहिल मोहम्मद खाटीक (वय २३, रा. बिलाल चौक, तांबापुरा) हा तरुण त्याच्या वडिलांसह महामार्गालगत रिलायन्स पेट्रोल पंपाजवळच मच्छी विक्रीचे दुकान लावत होता. आज शनिवारचा आठवडे बाजार असल्याने माल घेण्यासाठी तो नेरी (ता. जामनेर) जात असतानाच त्याचा अपघाती मृत्यू ओढवला. साहिलच्या पश्चात चार बहिणी, आई-वडील असा परिवार असून, चार बहिणींच्या एकुलत्या भावाचा असा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.