पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदी पुलावर छोटे मोठे खड्डे पडून पुल बांधकामात वापरलेल्या लोखंडी पट्टय़ा धोकादायक रित्या बाहेर पडल्याने पुलाचे निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.
या कडे रस्ते विकास प्रकल्पच्या अधिकार्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. हे खड्डे रात्री अपरात्री प्रवासादरम्यान एखाद्याच्या जिवावरही बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावराचे सहापदरीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सकाळ व सायंकाळच्या सत्रात वाहतुकीस कोंडी होत असल्याने वाहन धारकांना गाडी चालवतांना तारेवरील कसरत करावी लागत आहे. या अशा प्रकारच्या कामा मुळे नेहमीच लहान मोठे अपघात घडत आहेत. परिणामी या अपघातामुळे काहीना अपंगत्व तर काहीना आपले जीवनही गमवावे लागले आहे.
महामार्गावर अहोरात्र आंतरराष्ट्रीय वाहतुक सुरू असते तर सकाळच्या व सायंकाळच्या सत्रात सांगली, इचलकरंजी, पुणे व शिरोली पंचक्रोशीतील अनेक गावातून लोक कोल्हापूर शहराकडे येणे जाणे करतात. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक कोंडी निर्माण होते. ही कोंडी नदी पुलावर पडलेले खड्डे व त्यातून बाहेर आलेल्या लोखंडी पट्टय़ा चुकविण्याच्या नादात वाहनधारकांना नागमोडी कसरत करत गाडी चालवावी लागते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे तर पुल बांधकामात वापरण्यात आलेल्या लोखंडी पट्टी दीड ते दोन फुटाने उचकटून बाहेर आल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जिव मुठीत धरून गाडी चालवावी लागत आहे.
रात्रीच्या वेळी बेंगलोरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कार व दुचाकीसारख्या गाड्यांना या वर उचललेल्या लोखंडी पट्टय़ाचा धोका निर्माण झाला आहे. अपघात होऊन एखादी व्यक्ती जीवास मुकण्या आधी रस्ते विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभिर्याने लक्ष घालून वर उचलेल्या लोखंडी पट्ट्या व खड्डे बुजविने गरजेचे आहे.