अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या एका घोषणेमुळे भारताला चांगलाच धक्का बसला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचे भारत सरकारकडून विश्लेषण केले जात आहे. ट्रम्प यांचा या निर्णयाने भारताला नेमका काय फटका बसणार आहे? किती कोटींचे नुकसान होऊ शकते? तसेच अमेरिकेने लावलेला हा टॅरिफ कमी कसा करता येऊ शकतो? यावर भारताचा अभ्यास चालू आहे. दरम्यान, एकीकडे ट्रम्प यांच्या 25 टक्के टॅरिफ आकारण्याच्या धक्कादायक निर्णयातून सावरत असताना भारताला ट्रम्प यांनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे. आम्ही भारतावर आणखी टॅरिफ लावणार आहोत, अशी मोठी आणि धक्कादायक घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.
भारतावर आणखी टॅरिफ लावण्यात येणार
मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतावर आणखी टॅरिफ लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. रशियामुळे युक्रेनमध्ये किती लोक मरत आहेत, याची भारताला काळजी नाही, असंही ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. भारत केवळ मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत नाहीये तर खरेदी केलेल्या तेलाचा बहुतेक भाग भारत खुल्या बाजारात नफ्यासाठी विकत आहे, असा मोठा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची ही भूमिका म्हणजे…
तसेच रशियन युद्धयंत्रणेमुळे युक्रेनमध्ये किती लोक मारले जात आहेत, याची भारताला परवा नाही. त्यामुले भारताच्या टॅरिफमध्ये लक्षणीय वाढ करण्यात येणार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची ही भूमिका म्हणजे संपूर्ण भारतासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
भारत नेमकी काय भूमिका घेणार?
दरम्यान, ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टमध्ये ते भारतावर नेमका आणखी किती टक्के टॅरिफ वाढवणार आहेत, याची सविस्तर माहिती दिलेली नाही. पण रशियाच्या युक्रेनसोबतच्या युद्धविषयक धोरणामुळे आणि या युद्धाबाबत भारताच्या भूमिकेमुळे ट्रम्प यांनी ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता भारत ट्रम्प यांच्या या धोरणावर नेमकी काय भूमिका घेणार? तसेच भारत या आव्हानातून कसा मार्ग काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.