चारित्र्याच्या संशयावरून जिल्ह्यात २४ तासात दोन विवाहित महिलांची हत्याच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनेत मारेकरी पतीच निघाला असून, दोन्ही मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पहिली घटना यवतमाळ तालुक्यातील रुई येथे बुधवारी (ता. ६) दुपारच्या सुमारास घडली. तर दुसरी घटना गुरुवारी (ता. ७) चौसाळा मार्गावरील बोदड येथे घडली.
यवतमाळ तालुक्यातील रुई गावाशेजारी राहणार्या संजू इंगळे यांच्या शेतातील बंड्यावर राहुल डोंगरे आणि पत्नी मंदा, तीन मुले, आई वडिलांसोबत राहत होता.पती राहुल पत्नी मंदा हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेऊन वाद करीत होता.
अशात बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास राहुल याने पत्नी मंदा हिच्या डोक्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला घरात सोडून दार बंद करून निघून गेला होता.
ही बाब शाळेतून घरी परतलेल्या मोठ्या मुलीच्या लक्षात आली असता, तिने आरडाओरड केली. तेव्हा परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. तसेच या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली.
जखमी मंदा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरी घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. भोसा मार्गावरील चंद्रशेखर उर्फ चंदू ठक गेल्या काही महिन्यापासून पत्नी दिव्यानी हिच्यावर संशय घेत होता. काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झाल्याने पत्नी दिव्यानी ही तिच्या भावाकडे गेली होती. चंद्रशेखर मुलाला भेटण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी पुन्हा पती पत्नीत वाद झाल्याने रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या केली.