वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डस् या प्रतिष्ठित जागतिक संस्थेने महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर येथील चिमुकली शांभवी अभिजित पाटील हिला ‘यंगेस्ट कीड टू रोलओव्हर फ्ल-ॉम बॅक टू टमी’ (पाठीवरून पोटावर उलटणारे सर्वात लहान वयाचे बाळ) या श्रेणीमध्ये जागतिक विक्रम धारक म्हणून मान्यता दिली आहे.
केवळ 2 महिने 16 दिवसांच्या वयात पाठीवरून पोटावर उलटण्याची अद्वितीय कसरत करून शांभवीने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
हा विक्रम तिने 5 जून 2025 रोजी हेरवाड येथे साध्य केला. संस्थेच्या काटेकोर पडताळणीनंतर हा विक्रम अधिकृतरीत्या नोंदविण्यात आला आहे. शांभवीला अमेरिकेतील वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डस्कडून प्रशस्तीपत्रक व मेडल देऊन गौरविण्यात आले आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय युनायटेड किंग्डम (युके) येथे असून, जगभरातील विविध क्षेत्रातील अनोख्या आणि दुर्मीळ कामगिरींची नोंद ठेवण्यात ही संस्था विशेष मान्यता पावलेली आहे.
शांभवी पाटील हिचा जन्म 20 मार्च 2025 रोजी हेरवाड येथे झाला. हिने पाठीवरून पोटावर उलटण्याचा हा विक्रम महिला श्रेणीमध्ये सर्वात कमी वयात साध्य केला. हा पराक्रम साध्य करताना तिचे वय केवळ 2 महिने 16 दिवस होते. ज्यामुळे ती जागतिक पातळीवर सर्वात लहान वयाची ‘बॅक टू टम्मी रोलओव्हर’ करणारी बालिका ठरली आहे. शांभवीची ही नैसर्गिक हालचाल आम्हाला आश्चर्यचकित करून गेली. तिच्या या यशाने आम्हाला आणखी प्रेरणा मिळाली, असे पाटील दाम्पत्याने सांगितले. वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डस् ही संस्था विविध देशांतील सहभागींची अनोखी कर्तबगारी नोंदवून त्यांना प्रमाणपत्रे व गौरवचिन्हे प्रदान करते. शांभवीचा हा पराक्रम ‘बॉर्न टू बी हाई’ या संस्थेच्या घोषवाक्याला साजेसा ठरला आहे.