भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी समस्त भारतीयांना एक आनंदाची बातमी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मोठी भेट देत त्यांनी लाल किल्ल्यावरून एक मोठी घोषणा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, यंदाच्या दिवाळीत जीएसटीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. ज्यामुळे देशातील जनतेला कमी कर भरावा लागेल. मोदी म्हणाले, दिवाळीनिमित्त तुमच्यासाठी एक भेट म्हणून जनरेशन जीएसटी सुधारणा आणत आहोत. सामान्य लोकांसाठी कर मोठ्या प्रमाणात कमी होतील. विशेषतः लहान व्यवसाय आणि एमएसएमई क्षेत्राला याचा फायदा होईल. यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती कमी होतील. त्यातून अर्थव्यवस्थेलाही एक नवी चालना मिळण्यास मदत होईल.
दरम्यान, गेल्या ८ वर्षात जीएसटीमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे. संपूर्ण देशात करांचा बोजा कमी केला आहे आणि कर प्रणाली सुधारली आहे. ८ वर्षांनंतर, त्याचा आढावा घेणे ही काळाची गरज आहे. यासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करून त्याचा आढावा घेण्यात आला आणि राज्यांशीही चर्चा केली असल्याचेही मोदींनी सांगितले. पुढे मोदी असेही म्हणाले की, जीएसटीमधील सुधारणांचा फायदा सर्वसामान्यांना मिळेल. ज्यामुळे लोकांकडून भरला जाणारा कर कमी होईल.