येथील राहुल आवाडे युवा सेनेच्या वतीने यंदाही गोकुळ अष्टमीनिमित्त सोमवार १८ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, स्टेशन रोडवरील केएटीपी मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्याला तब्बल ३ लाख ११ हजार रुपयांचे बक्षिस असणार आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, राहुल आवाडे युवा सेनेच्या माध्यमातून दरवर्षी भव्य अशा दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाही ही स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि आगळ्यावेगळ्या पध्दतीने आयोजित करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी असा नांवलौकिक मिळविलेल्या या स्पर्धेत यंदा रॉक बॅण्ड हा आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर मनमोहक विद्युत रोषणाई आणि चित्ताकर्षक आतषबाजी करण्यात येणार आहे.
गतवर्षी यशोलक्ष्मी सांस्कृतिक भवन परिसरात झालेल्या स्पर्धेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. यंदाही त्यापेक्षाही अधिक प्रतिसाद लाभेल असा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला. सातत्याने भरविण्यात येत असलेल्या या स्पर्धेमुळे आता इचलकरंजी शहरातही गोविंदा पथक सज्ज होऊ लागली आहेत. अशी गोविंदा पथके तयार व्हावीत यासाठी आपलेही सहकार्य असणार आहे. भारतीय खेळ आणि संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी या माध्यमातून प्रयत्न असल्याचेही आमदार आवाडे म्हणाले.
सोमवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ५ ते ६ संघांचा समावेश असणार आहे. तर विजेत्याला तब्बल ३.११ लाखाचे बक्षिस दिले जाणार आहे. सहभागी गोविंद पथकांसाठी विमा संरक्षण व प्रत्येक खेळाडूच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत.
तर या निमित्ताने सोशल मिडीयावर जोरदार मुसंडी मारत असलेल्या रिल्स स्पर्धेचेही आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी तमाम नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार आवाडे यांनी यावेळी केले.
पत्रकार परिषदेत प्रकाश दत्तवाडे, श्रीरंग खवरे, बाळासाहेब माने, शशिकांत मोहिते, नाना पाटील, राजू बोंद्रे, नितेश पोवार, दीपक सुर्वे, इम्रान मकानदार, नागेश पाटील आदी उपस्थित होते.