पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस या वेळी अतिशय खास पद्धतीनं साजरा करण्याची तयारी सुरू आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने 17 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत देशभरात अनेक समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ सुरू करणार आहेत, या उपक्रमाचा उद्देश हा महिला आणि मुलांसाठी असलेली आरोग्य सेवा अधिक मजबूत करणे असणार आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 सप्टेंबर रोजी ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची सुरुवात करणार असल्याचं त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या उपक्रमाचा उद्देश हा देशभरातली महिला आणि बालकांचं आरोग्य अधिक मजबूत करणं, त्यांच्यापर्यंत तातडीनं आरोग्याच्या विविध सेवा पोहोचवणं आणि जागृतता निर्माण करणं असल्याचंही नड्डा यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
75 हजार आरोग्य शिबिराचं आयोजन
नड्डा यांनी पुढे म्हटलं की, या उपक्रमांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर, सामुदायिक आरोग्य केंद्र (सीएचसी) आणि इतर ठिकाणी 75 हजार आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. हा उपक्रम देशभरातली महिला आणि बालकांच्या आरोग्यविषयक गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. या शिबिरांमध्ये महिला आणि बालकांना आरोग्याच्या प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अंगनवाडीमध्ये पोषण महिना उपक्रम
या व्यतिरिक्त पोषण आणि आरोग्य याबाबत जागृतता निर्माण करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीमध्ये पोषण महिना उपक्रम राबवण्यात येणार आहे, या सर्व उपक्रमांचा उद्देश हा देशभरात स्वस्त आणि आरोग्यदायी कुंटुब निर्माण करण्याचा आहे, असंही यावेळी नड्डा यांनी म्हटलं आहे.
जेपी नड्डा यांचं आवाहन
दरम्यान या अभियानाचा एक भाग म्हणून जेपी नड्डा यांच्याकडून सर्व खासगी रुग्णालयांना देखील आवाहन करण्यात आलं आहे की, त्यांनी या उपक्रमाचा भाग होऊन हे अभियान अधिक मजबूत बनवावं.




