कोरोची येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली. दिया सचिन गायकवाड (वय 20, रा. इंदिरानगर कोरोची) व सिद्धांत श्रीकांत सगरे (वय 24, रा.धुळेश्वरनगर कबनूर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून साडे तीन तोळे सोने-चांदीचे दागिने, बुलेट व दोन मोबाईल असा एकूण 4 लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
कोरोची येथील विवेकानंदमध्ये राहणार्या भारती सज्जन ढाले यांच्या घरी 7 सप्टेंबर 2025 रोजी कपाटातील लॉकर उचकटून सोने-चांदीचे दागिने चोरीस गेले होते. याबाबत संशयित तुळजाभवानी मंदिर परिसरात फिरत असल्याची माहिती गोपनीयरित्या तपास अधिकारी आरिफ वडगावे यांना मिळाली. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता सोने-चांदीचे दागिने चोरल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानुसार गुन्ह्यात वापरलेली विना नंबर प्लेट बुलेट, दोन मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश मुंगसे, अरिफ वडगावे, रोहित डावाळे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार, ज्ञानेश्वरी राख यांनी केली.
लग्नासाठी केली चोरी
संशयित दिया गायकवाड ही भारती ढाले यांच्या घराशेजारी पूर्वी राहत होती. त्यामुळे ढाले हे घराला कुलूप लावून जाताना किल्ली कुठे ठेवायचे याची तिला माहिती होती. त्यामुळे तिने आपला मित्र सिद्धांत याच्या संगनमताने लग्नाला लागणार्या पैशासाठी चोरी केली. मात्र, चोरी उघडकीस आल्यामुळे लाखोंचा मुद्देमालही गेला व पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले अशी माहिती पोलिसातून मिळाली.