राज्य परीक्षा परिषदेमार्फत सध्या नवीन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा घेण्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात 23 तारखेला संबंधित परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकार्यांनी दिली आहे.
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षकपदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाइन पध्दतीने घेण्यात येत आहे. टीईटी परीक्षेचा अर्ज उमेदवारांना ऑनलाइन भरावा लागणार आहे. परंतु, संबंधित अर्ज भरत असताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अर्ज बिनचूक असावा, यासाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये टीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यापासून ते परीक्षेपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
परीक्षा घेण्यासाठी किमान दोन महिने आधीपासूनच सर्व तयारी सुरू करावी लागते. परीक्षेची रीतसर जाहिरात प्रसिध्द करणे, उमेदवारी अर्ज मागविणे व अर्ज तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेशपत्र वाटप करणे, बैठकव्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात येत असतो. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात वेळापत्रक जाहीर केले तरच नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेणे शक्य होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात 16 आणि 23 अशा दोन तारखा परीक्षा परिषदेने काढल्या आहेत. एमपीएससी, यूपीएससी यांसह अन्य परीक्षांच्या तारखांची पडणाळणी करून शक्यतो 23 नोव्हेंबरलाच परीक्षा घेण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेतील अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
अनुत्तीर्ण उमेदवारांना संधी
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच शिक्षकी सेवेत असलेल्या; परंतु टीईटी अनुत्तीर्ण उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच टीईटी उत्तीर्ण न झाल्यास त्यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन त्यांच्या जागेवर टीईटी उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्यासंदर्भात सूतोवाच केले आहेत. यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. परंतु, शिक्षकी पेशातील संबंधित उमेदवारांना नोव्हेंबर महिन्यात होणारी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची एक चांगली संधी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
– डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या 23 नोव्हेंबरला राज्यात टीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासंदर्भातील पूर्वतयारी सुरू असून, येत्या काही दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भातील संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल आणि त्यानुसार राज्यात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा पार पडणार आहे.