राज्यातील महिलावर्गाला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा आजही महाराष्ट्रातील करोडो महिला घेत आहेत.
निम्म्या पैशात तिकीट मिळत असल्याने तासनतास महिला एसटी बसची आतुरतेने वाट बघत असतात. परंतु आता याच महिलांना सरकारने जोर का धक्का दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी तिकिट सवलतीत महत्त्वाचे बदल केले आहेत. एसटी महामंडळाने महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी एक विशेष ओळखपत्र अनिवार्य केले आहे. हे ओळखपत्र असेल तरच महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिटात सवलत मिळणार आहे.
मार्च 2023 पासून महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बससेवेवर साधी, मिनी, निमआराम, शिवशाही आणि शिवशाही स्लीपर 50% सवलत दिली जात आहे. ही सवलत अजूनही कायम आहे, परंतु त्याच्यासाठी यापूर्वी महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना आधारकार्ड दाखवणे गरजेचं होते. आधारकार्ड नसेल तर ५० टक्के सवलतीचा लाभ मिळत नव्हता.. आता मात्र एसटी महामंडळाने राज्य परिवहन महामंडळाचे अधिकृत ओळखपत्र असणे अनिवार्य केलं आहे. एसटी महामंडळाकडून हे ओळखपत्र दिले जाणार असून यासाठी महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर हे ओळखपत्र बनवावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे हे विशेष ओळखपत्र नसेल तर तुम्हाला एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला प्रवासाचे संपूर्ण तिकिटाचे पैसे द्यावे लागतील.
का घेतला हा निर्णय?
शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या सवलतींचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. सवलतींचा गैरवापर टाळण्यासाठी महामंडळाकडून अधिकृत ओळखपत्र जारी करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे सवलतीचा प्रवास योग्य आणि पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे तसेच यामुळे योजना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि व्यवस्थीत राबवता येणार आहे असा विश्वास एसटी महामंडळाला वाटत आहे.