उच्चस्तरीय समितीकडे नांदणी मठ, राज्य शासन व वनताराकडून अर्ज दाखल होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे अॅड. मनोज पाटील यांनी दिली.शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात महादेवी हत्तीणसंदर्भात न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्यासमोर सुनावणी झाली होती.
यावेळी राज्य सरकारचे वकील अॅड.धर्माधिकारी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून हत्तीणीला वनतारा येथे पाठविण्यात आल्याचे सांगितले. तथापि राज्य सरकारने वनतारा आणि नांदणी मठाशी समन्वय साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करून नांदणी मठाच्या स्वत:च्या जागेमध्ये वनाताराच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत हत्ती पुनर्वसन केंद्र तातडीने उभा करून त्याठिकाणीच हत्तीणीवर पुढील उपचार करण्याचे ठरलेले आहे, असेही स्पष्ट केले.
याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाने महादेवी हत्तीण नांदणी मठाकडे पाठविण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीने निर्णय घेण्यासंदर्भातचा आदेश दिला होता. याचा आदेश मंगळवारी प्राप्त झाल्यानंतर नांदणी मठाकडून आपले म्हणणे तयार करण्यात आले आहे. यावर कोल्हापूर येथे महास्वामीजी यांच्या स्वाक्षर्या पूर्ण झाल्या आहेत. ही सर्व कागदपत्रे घेऊन टीम दिल्लीकडे रवाना झाली आहे. गुरुवारी उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करण्यात येणार आहे. निर्णयाकडे महाराष्ट्र-कर्नाटक राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.