दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यात अनेक कंपन्या सहभागी होणार आहेत.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने रोजगार निर्मितीसाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. त्यात रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. केंद्राकडून वर्षभरात जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात हे मेळावे आयोजित केले जाते. या मेळाव्यांच्या माध्यमातून नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी संधी मिळते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने आता सासवडमधील लॉनिंग एज्युकेशन इन्स्टिट्यूट कौशल्य विकास संस्थेच्या सहकार्याने 27 सप्टेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा सासवडमधील हडको रस्त्यारील लॉगिन पॅरामेडिकल कॉलेज (आदित्य कॉम्प्लेक्स) येथे सकाळी १० वाजता होणार आहे.
पुरंदर तालुका परिसरातील विविध उद्योजक या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडून ३०० पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही सर्व रिक्तपदे किमान दहावी, बारावी, पदवीधर, मशिन ऑपरेटिंग, प्रोडक्श, क्लर्क, ओटी टेक्निशियन, परिचारिका, परिचर, सेवक, रेसेपनिस्ट, प्रशिक्षणार्थी अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी आहेत. पुणे जिल्ह्यातील जास्तीतजास्त उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे तसेच मुलाखतीस येताना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पारपत्र आकाराचे छायाचित्र आणि आवश्यकतेनुसार बायोडाटा अर्जाच्या प्रती सोबत आणणे गरजेचे आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे कार्यालयीन वेळेमध्ये प्रत्यक्ष अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सु. रा. वराडे यांनी केले आहे.