मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
पण ई-केवायसी करण्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागणार? ई-केवायसी कुठे करायची? ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख कोणती? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात…
e-KYC करण्यासाठी वेबसाईट कोणती?
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
e-KYC कधीपर्यंत करता येईल?
ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्याचे e-KYC करायचे आहे.
लाडक्या बहिणींची e-KYC करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार?
ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थी महिलांना पुन्हा काही माहिती, कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड, लाभार्थी महिलेचा फोटो, रेशन कार्ड, उत्पन्नाची माहिती, आधार कार्ड क्रमांक यांचा समावेश आहे.
ई-केवायसी मोबाईलवरुनही करता येणार
महिला व बाल विकास विभागाकडून e-KYC माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
यासंदर्भात आर्थिक मागणी करीत असेल त्यास लाभार्थींनी बळी पडू नये असे आवाहनही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.





