दुबईमध्ये काल झालेल्या रोमांचक सामन्यात पाकिस्तानला हरवून भारतीय संघाने 9व्या आशिया कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. फायनलची लढत खूप थरारक गोती, पाकिस्तानी संघ बाजी पलटवून जिंकू शकेल असंही अनेक वेळा वाटलं पण अखेर टीम इंडियानेच विजय मिळवला. मात्र या सामन्याची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा नंतरच्या प्रेझेंटेशन सेरेमनीची देखील झाली. त्यातला वादही समोर आला, कारण प्रेझेंटेशन सोहळ्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी एसीसी अध्यक्ष आणि पीसीबी प्रमुख मोहसीन नकवी यांच्याहातून ट्रॉफी स्वीकारण्यास ठाम नकार दिला. त्यानंतर नकवी यांनी ट्रॉफी बाहेर पाठवून दिली.
त्यानंतरही भारतीय खेळाडूंना फार फरक पडला नाही,त्यांनी ट्रॉफी शिवायही तूफान सेलिब्रेशन केलं. टीम इंडियाच्या खेळाडूंनी ट्रॉफी हातात घेतल्याचे नाटक करत फोटो काढण्यासाठी पोज दिली. पण या सगळ्यातही, प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे : भारताला आता ट्रॉफी मिळणार नाही का? चला आयसीसीच्या ट्रॉफीबाबतच्या नियमांबद्दल जाणून घेऊया.
एखाद्या संघाच्या कर्णधाराने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणे हे आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत येऊ शकते, परंतु त्याबाबत कोणतेही विशिष्ट नियम नाहीत. ते क्रिकेटच्या भावनेविरुद्ध असू शकते. त्यामुळे आता भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी का स्वीकारली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, त्यानंतर स्पर्धा संस्था (एसीसी) किंवा आयसीसी कोणत्याही कारवाईचा निर्णय घेईल.
क्रिकेटची भावना
एखादा सामना किंवा विजेतेपद जिंकल्यानंतर ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणे हे क्रिकेटच्या भावनेचा अनादर मानले जाऊ शकते, जे आयसीसीच्या आचारसंहितेचे रक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे.
त्यामुळे आता टीम इंडियाचा कर्णधार किंवा प्रतिनिधीला ट्रॉफी न स्वीकारण्याचे स्पष्ट आणि वैध कारण आयसीसीला द्यावे लागेल.
आयसीसी परिषदेत निषेध
आयसीसीच्या पुढील परिषदेत बीसीसीआय या घटनेचा अधिकृतपणे तीव्र निषेध नोंदवू शकते.
ICC शिस्तभंग प्रक्रिया
गैरवर्तनासाठी आयसीसीकडे शिस्तभंगाची प्रक्रिया आहे. ते आयसीसी आचारसंहितेअंतर्गत परिस्थितीचा आढावा घेऊ शकतात. कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले आहे हे तपासले जाईल आणि जर तसं झालं असेल तर उल्लंघनांसाठी कोण जबाबदार आहे आणि कोणते दंड आकारले जाऊ शकतात हेही चेक करण्यात येईल.
एसीसी अध्यक्षांविरुद्ध बीसीसीआय नोंदवणार तीव्र निषेध
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एसीसी बैठकीत एसीसी प्रमुख आणि पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याविरुद्ध तीव्र निषेध नोंदवेल. खेळाडूंनी मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, त्यानंतर दुसरा एखादा वरिष्ठ अधिकारी संघाला ट्रॉफी देऊ शकला असता.
भारत अशा व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारू शकत नाही जो त्यांच्या देशाविरुद्ध युद्ध पुकारत आहे असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले. आम्ही त्यांच्याकडून (मोहसीन नक्वी) ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता, पण याचा अर्थ त्यांना ट्रॉफी त्यांच्या हॉटेलच्या खोलीत नेण्याची परवानगी आहे, असा अर्थ होत नाही. “नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत आम्ही तीव्र निषेध नोंदवू. जर पीसीबीने आयसीसीकडे तक्रार केली तर आयसीसी अंतिम निर्णय घेईल,” असे ते म्हणाले.
ट्रॉफीवर टीम इंडियाचा हक्क
आशिया कप 2025 च्या ट्रॉफीवर भारताचा हक्क आहे. ही केवळ भेट नाही तर टीम इंडियाने ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि सर्व प्रतिस्पर्धी संघांना हरवले. ट्रॉफी घेण्याचा अधिकार इतर कोणालाही नाही. भारतीय खेळाडूंना जर मोहसीन नक्वीशी हस्तांदोलन करायची किंवा त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायची इच्छा नसेल आणि त्यासाठी कोणताही नियम नसेल, तर ते ठीक आहे. पण एखाद्या संघाने नुकतीच जिंकलेला ट्रॉफी हिसकावून घेणे आणि ती सोबत घेऊन जाणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.





