वनडे वर्ल्डकप 2027 च्या दृष्टीने आता बीसीसीआयने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने बीसीसीआयने कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलकडे सोपवली आहे. तर रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून त्याला फक्त फलंदाज म्हणून संघात ठेवलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे यशस्वी नेतृत्व करून आणि भारतीय संघाला चॅम्पियनशिप मिळवून दिल्यानंतरही रोहित शर्माला अचानक कर्णधारपदावरून काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे त्याच्या उचलबांगडीसाठी क्रीडाप्रेमी टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीरकडे बोट दाखवत आहेत. गौतम गंभीरचा यात डाव असल्याची टीका अनेकांनी सोशल मीडियावर केली आहे. गौतम गंभीरच्या सूचनेवरून रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. रोहित शर्माच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर विरोध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवरही निशाणा साधला.
गौतम गंभीर व्हिडीओत काय म्हणतोय?
गौतम गंभीरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक असलेले गौतम गंभीर रोहित शर्माचे कौतुक करताना दिसत आहेत.’जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही तर ते टीम इंडियाचे दुर्दैव असेल, रोहितचे नाही. जर तो टी20 आणि व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार झाला नाही तर ते लाजिरवाणे असेल.’ इतकंच काय तर गंभीर व्हिडिओमध्ये पुढे म्हणतो की रोहित शर्मा यापेक्षा जास्त काही करू शकत नाही.
विराट कोहली कर्णधार असताना गौतम गंभीरने केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. आता गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक आहे.असं असताना त्याला कर्णधारपदावरून काढणं अनेकांना रूचलेलं नाही. त्यामुळे अनेक जण गौतम गंभीर यांच्यावर टीका करत आहेत. या व्हिडिओनंतर आता चाहते गौतम गंभीरला खूप ट्रोल करत आहेत. रोहित शर्मा 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळेल आणि संघाचं नेतृत्व करेल अशी अपेक्षा होती. पण आता तसं होणार नाही. उलट त्याचं संघात स्थान राहील की नाही याबाबतही आता शंका उपस्थित केली जात आहे.




