Friday, October 17, 2025
Homeकोल्हापूरतक्रार माघारीसाठी 5 लाखांच्या खंडणीची मागणी; तीन महिलांसह अल्पवयीनाला घेतले ताब्यात

तक्रार माघारीसाठी 5 लाखांच्या खंडणीची मागणी; तीन महिलांसह अल्पवयीनाला घेतले ताब्यात

अत्याचारप्रकरणी दाखल तक्रार माघारी घेण्यासाठी पाच लाखांच्या खंडणीची मागणी करणार्‍या तीन महिलांसह एका अल्पवयीन संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केले. मुख्य संशयित नेताजी शिंदे (रा.मुळेगाव, जि. सोलापूर) हा पसार झाला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षा पार्किंगजवळ सापळा रचून गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून 12 हजारांची रोकड व अन्य साहित्य असा 72 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

फिर्यादी मारुती शामराव एकशिंदे (वय 70, रा. निगवे दुमाला, ता.करवीर) यांचा मुलगा गणेश याने अत्याचार केल्याप्रकरणी पीडित महिलेने त्याच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित गणेश एकशिंगे याला अटक केली आहे. पीडित महिलेसह तिचा साथीदार नेताजी शिंदे याने संशयित मुलाचे वडील मारुती एकशिंगे यांच्याशी संपर्क साधला. तुमच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यास सहा महिने जामीन होऊ शकत नाही.

 

या प्रकरणात त्याला आम्ही जामीन होऊ देणार नाही; शिवाय तो जामिनावर बाहेर आला तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. आम्ही बलात्काराचा गुन्हा माघारी घेतो, त्यासाठी 5 लाख रुपये द्यावे लागतील, असेही त्याने सुनावले. पीडित महिलेसह शिंदे याने एकशिंगे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून पाच लाखांच्या खंडणीसाठी वारंवार तगादा लावला. मारुती एकशिंगे यांनी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. खंडणीच्या मागणीची माहिती दिली. पोलिस अधीक्षकांनी त्याची दखल घेत पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक निरीक्षक सागर वाघ यांना कारवाईच्या सूचना केल्या. चौकशीअंती घटनेमध्ये तथ्य आढळून आले.

 

पथकाने सापळा रचला. फिर्यादी एकशिंगे यांनी पाच लाख देण्यास टाळाटाळ केली. अखेर 3 लाखांवर सौदा ठरला. 3 लाखांची रक्कम उपलब्ध नसल्याने 500 रुपयांच्या डमी नोटा वापरून नोटांचे सहा बंडल करण्यात आले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महिलेसह संशयिताला बोलावण्यात आले. फिर्यादीकडून नोटांचे बंडल घेत असताना पथकाने तीन महिला व एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांची चाहूल लागताच नेताजी शिंदे तेथून पसार झाला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -