विश्रामबाग चौकातून पळवलेल्या एक वर्षाच्या मुलाचा सावर्डे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे एक लाख ८० हजार रुपयांना सौदा करण्यात आला होता. पोलिसांनी हा डाव उधळून लावत, त्या बाळाला आईच्या कुशीत सुखरूपपणे सुपूर्द केले.
ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तीन दिवस शोधमोहीम राबविली. विश्रामबाग आणि एलसीबीच्या संयुक्त पथकाला अखेर यश आले. पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत ते बाळ आईकडे देण्यात आले. फुगे विकणाऱ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. स्वतः अधीक्षक संदीप घुगे यांनी त्या बाळाला मिठाई भरवल्याने सारेच गहिवरले.
दरम्यान, याप्रकरणी मिरजेतील एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या, तर त्याचे दोन साथीदार अद्याप पसार आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये इनायत अब्दुलसत्तार गोलंदाज (वय ४३, किल्ला भाग, मिरज) याचा समावेश आहे. त्याचे साथीदार इम्तियाज पठाण, वसिमा इम्तियाज पठाण हे दोघे पसार झाले आहेत. त्यांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी विक्रम पुष्पचंद बागरी सध्या विश्रामबाग चौक) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २१) फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील कनवास येथे राहणारे विक्रम बागरी हे कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी सांगलीत आले होते. त्यांना एक मुलगी आणि एक वर्षांचा मुलगा आहे. दररोज सकाळी ते आणि त्यांची पत्नी विश्रामबाग चौकात चरितार्थासाठी फुगे विकायचे. त्यातून जे पैसे मिळत, त्यातून त्यांचा रोजचा दिवस बाहेर पडायचा. निश्चित ठावठिकाणा कोठे नसल्याने ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता हे कुटुंब विश्रामबाग चौकातील दुभाजकावरच झोपायचे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे ते कुटुंबासह झोपले होते. लहानगा एक वर्षांचा चिमुकला आईच्या कुशीत होता.
मात्र, पहाटेच्या सुमारास चिमुकला गायब झाला होता. चोरट्यांनी मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास चिमुकल्याचे अपहरण केले. ही बाब लक्षात येताच आईने हंबरडा फोडला. चिमुकल्याच्या वडिलांसह कुटुंबाने तातडीने पोलिस ठाणे गाठले. सारी हकीकत पोलिसांना सांगितली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विश्रामबाग गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांचे पथक लगेचच चिमुकल्याच्या शोधार्थ रवाना करण्यात आले. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणची स्वतंत्र पथकेही जिल्ह्याच्या बाहेर पाठविण्यात आली. शहरातील अनेक सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्यामुळे पोलिसांच्या तपासकामात अडथळा येत होता; परंतु गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील संदीप नलावडे आणि अमिरशा फकीर यांना खबऱ्या आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरण करण्याचा टोळीचा सुगावा लागला. संशयित इनायत गोलंदाज, इम्तियाज पठाण आणि वसिमा पठाण या तिघांनी या चिमुकल्याचे अपहरण केल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली.
पोलिसांनी वेळ न दवडता तातडीने मिरजेतून इनायत गोलंदाज याचा ठावठिकाणा काढून त्यास ताब्यात घेतले. सहायक निरीक्षक पवार यांनी संशयित गोलंदाज याकडे केलेल्या चौकशीत, तिघांनी मिळून अपहरण केलेल्या चिमुकल्याची रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे विक्री केल्याचा प्रकार समोर आला. सावर्डे येथील सचिन राजेशिर्के यांना मूलबाळ नसल्याची माहिती संशयित वसिमा हिला मिळाली होती. तिने त्यांच्याशी परिचय वाढवून त्यांना मुलगा देण्याचे आश्वासन दिले आणि राजेशिर्के यांच्याकडून एक लाख ऐंशी हजार पैसे उकळले होते.
पोलिस चौकशीत ही माहिती निष्पन्न होताच पोलिस पथकाने थेट सावर्डे गाठले. तेथे राजेशिर्के यांच्याकडून या चिमुकल्यास ताब्यात घेण्यात आले. पोलिस पथक सांगलीत आल्यावर चिमुकल्याची वैद्यकीय तपासणी करून पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी त्याला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. आपल्या मुलाला तीन दिवसांनंतर सुखरुप पाहिल्यावर आई-वडिलांच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू कित्येक वेळ थांबत नव्हते.
ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश शिंदे आणि सुधीर भालेराव, सहायक निरीक्षक पंकज पवार आणि चेतन माने, उपनिरीक्षक कुमार पाटील, अंमलदार सपना गराडे, सागर लवटे, नागेश खरात, दरिबा बंडगर, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, सतीश माने, अमर नरळे, सुनीता शेवाळे, सुशील म्हस्के, साधना ओमासे, महादेव नागणे, मनीषा बजबळे, प्रशांत माळी, महम्मद मुलाणी, आर्यन देशिंगकर, योगेश पाटील, अजय पाटील, अभिजित पाटील यांचा समावेश होता.
दीपावलीचा मुहूर्त…
दीपावलीच्या पहिल्या दिवशी नरकचतुर्दशीलाच तिघा संशयितांनी विश्रामबाग चौकातून पहाटेच्या सुमारास चिमुकल्याचे अपहरण केले होते. त्याच दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील सचिन राजेशिर्के यांच्या ताब्यात चिमुकल्यास देण्यात आले. दोन्ही घटनांकरिता चोरट्यांनी दीपावलीचा मुहूर्त निवडला होता. मात्र, पोलिसांनी दीपावलीच्या अखेरच्या दिवशी भाऊबीजेला चिमुकल्याचा ताबा घेऊन त्याची सुखरूप सुटका केली. ज्यावेळी आईच्या ताब्यात चिमुकला देण्यात आला त्यावेळी तिचे आनंदाश्रू थांबत नव्हते.
नरबळीची शंका, पण…
नरकचतुर्दशीला बाळ पळवण्यात आले होते. नरबळीची शक्यता पोलिसांच्या मनात आली होती. त्या अनुषंगाने तपास सुरू केला. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याने तपासात अडथळे निर्माण होत होते. अखेर पोलिसांनी कौशल्यपणाला लावत त्या बाळाचा शोध घेतला.
त्यांची दिवाळी केली
सावली बेघर निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर यांनी दिवाळीपुर्वी या दाम्प्त्यास दिवळीनिमित्त कपडे दिले होते. त्यांचा मुलगा पळवल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. पोलिसांनी त्या मुलाला शोधून काढल्यानंतर मुजावर यांनी त्या बाळाला कपडे आणून दिले.






