Monday, November 24, 2025
Homeकोल्हापूरशिवाजी विद्यापीठाची प्रशासकीय बाजू मजबूत; ६६ गुणांसह राज्यात दुसरा क्रमांक मिळवत कोल्हापूरचे...

शिवाजी विद्यापीठाची प्रशासकीय बाजू मजबूत; ६६ गुणांसह राज्यात दुसरा क्रमांक मिळवत कोल्हापूरचे नाव उज्ज्वल

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील तेरा अकृषी विद्यापीठांचे प्रशासकीय मूल्यांकन केले. त्यात शिवाजी विद्यापीठाने शंभर पैकी ६६ गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत आणि डिजिटल करण्यात विद्यापीठाला सर्वाधिक गुण मिळाले आहेत.

 

सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत उच्च शिक्षण विभागाने विविध नऊ निकषांवर राज्यातील विद्यापीठांचे प्रशासकीय मूल्यांकन केले. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाने सेवापुस्तक अद्ययावतीकरणामध्ये वीसपैकी वीस, तर सर्व संवर्गाची अद्ययावत ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करणे, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती आणि अनुकंपा नियुक्तीची दहापैकी दहा गुणांची कमाई केली आहे.

 

बिंदूनामावली प्रमाणीकरणामध्ये दहापैकी आठ गुण मिळाले आहेत. मात्र, सेवा प्रवेश नियम, सरळसेवा नियुक्ती रिक्त परिस्थिती या निकषामध्ये अवघे चार गुण मिळाले आहेत. आकृतीबंध आणि आयजीटीओ पोर्टलवर नोंदणीमध्ये विद्यापीठाला गुणांचे खाते उघडता आले नाही.

 

प्रशासकीय आकृतीबंध निश्चित नसल्याचा विद्यापीठाला फटका बसला आहे. आयजीटीओ पोर्टलमध्ये चांगली कामगिरी असूनदेखील काय कमी पडले, याचे विश्लेषण विद्यापीठाकडून केले जाणार आहे. दरम्यान, या मूल्यांकनात ६८ गुणांसह गोंडवाना विद्यापीठाने पहिला आणि मुंबई विद्यापीठाने ६६ गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला आहे.

 

सादर केलेल्या माहितीवर मूल्यांकन

 

या सर्व विद्यापीठांनी शासनाला यापूर्वी सादर केलेल्या माहितीच्या आधारे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामधील कामगिरीचे मूल्यमापन करून राज्यस्तरीय प्रशासकीय मूल्यांकन जाहीर केले आहे. शासनाकडून पहिल्यांदाच अशा पद्धतीने मूल्यांकन करण्यात आले आहे.

 

विद्यापीठाला मिळालेले निकषनिहाय गुण

 

सेवापुस्तक अद्ययावत करणे २०, सर्व संवर्गाची अद्ययावत ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणे १०, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती १०, अनुकंपा नियुक्ती १०, बिदूनामावली प्रमाणीकरण ८, सेवाप्रवेश नियम ४, सरळसेवा नियुक्ती रिक्त पद स्थिती ४, आकृतीबंध आणि आयजीओटी पोर्टलवर नोंदणी ०

 

‘विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी लावलेली प्रशासकीय शिस्त, परंपरा विद्यापीठाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अबाधित ठेवली आहे. त्याचे फलित या मूल्यांकनाच्या माध्यमातून मिळाले आहे. या यशाचे सर्व श्रेय विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -